काँग्रेस नेते नाना पटोले (nana patole) यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राज्याच्या विधानसभा उपाध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केल्याची माहिती खुद्द नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी त्यांचं नाव निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे. ( maharashtra speaker nana patole resign )
"आमच्या वरीष्ठ नेत्यांनी मला विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले. त्याचं मी पालन करुन माझ्या पदाचा राजीनामा विधानसभा उपाध्यक्षांकडे दिला आहे", असं नाना पटोले म्हणाले. नव्या जबाबदारीबाबत विचारलं असता नाना पटोले यांनी अजूनपर्यंत मला नव्या जबाबदारीबाबत काही कळविण्यात आलेलं नाही. मला फक्त विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे आदेश हायकमांडकडून आले आहेत, त्याचं मी फक्त पालन केलं आहे, असं पटोले म्हणाले.
पटोले यांच्यानंतर विधानसभा अध्यक्ष कोण?नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे आता नवा विधानसभा अध्यक्ष कोण होणार? याची चर्चा सुरू झाली आहे. पुढचा विधानसभा अध्यक्ष काँग्रसेचाच असणार का? याबाबत विचारलं असता याबाबत महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांचे महत्वाचे नेते याबाबत बैठक घेऊन निर्णय घेतील, असं पटोले म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माळ पटोलेंच्या गळ्यातकाँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदाचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून रखडला होता. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही स्वत:हून प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी दाखवली होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांची नावं चर्चेत आहेत. पण आता नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे प्रदेशाध्यक्षपदासाठी पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे.