मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना सरकारकडून वारंवार लोकांना मास्क घाला, सोशल डिस्टेंसिंग पाळा, लॉकडाऊन टाळा अशा सूचना देण्यात येत आहेत, महाराष्ट्रातील अनेक भागात कोरोना रुग्णवाढीमुळे ठाकरे सरकारची चिंता वाढली आहे, राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना विधान परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावेळी नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधला.(DCM Ajit Pawar Target MNS Chief Raj Thackeay)
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मंत्रिमंडळातील ७-८ सदस्य कोरोनाग्रस्त आहेत, काही आमदारांनाही कोरोना झालाय, फक्त मुख्यमंत्री, प्रविण दरेकर आणि सभापतींना कोरोना झाला नाही, मला कोरोना झाला, देवेंद्र फडणवीसांनाही कोरोना झालाय, तुमची रोग प्रतिकारकशक्ती जास्त असेल किंवा तुमचं जॅकेट पाहून कुठं आत शिरायचं म्हणून कोरोना झाला नसावा काय असेल माहिती नाही. कोरोना होऊ नये अशी इच्छा आहे, त्यामुळे उद्या समजा कोरोना झाला तर कशाला दृष्ट लावली म्हणून आमच्यावर पावती फाडाल असा चिमटा अजितदादांनी काढला.
त्याचसोबत राज्यावरचं कोरोनाचं संकट अद्याप टळलं नाही, अलीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, अमरावती, अकोला, पुणे, अशा विविध भागात कोरोना वाढत आहे, प्रशासकीय पातळीवर बैठका सुरू आहेत, सगळ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत, मास्क लावणे, सुरक्षित अंतर पाळणं याचे नियम पाळलेच पाहिजे. काही नेते म्हणतात मी मास्क वापरत नाही, पण दुसऱ्यांना त्रास झाला तर त्याचं काय...एकेकाळी प्रविण दरेकरांचे ते नेते होते असं म्हणत अजित पवारांनी नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला.
मी मास्क घालत नाही
कोरोना काळात लोकांनी मास्क घालावे म्हणून प्रशासनाकडून नेहमी आवाहन करण्यात येते, परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजपर्यंत कधीच मास्क घातला नाही, मंत्रालयात झालेल्या बैठकीवेळीही राज ठाकरेंनी मास्क घातला नाही, अनेकदा कृष्णकुंजवर लोकांनी गर्दी केली तेव्हाही राज ठाकरेंनी मास्क घातला नव्हता. अलीकडेच मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला शिवाजी महाराज पार्क येथे मनसेकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, तेव्हाही राज ठाकरेंनी मास्क घातला नव्हता. त्यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारताच मी मास्क घालत नाही, तुम्हालाही सांगतोय असं म्हणत उत्तर दिलं होतं. इतकचं नव्हे तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणावेळीही राज ठाकरेंनी मास्क घातला नव्हता.