अनिल भापकर
‘येऊन येऊन येणार कोण ..शिवाय दुसरा कोण’ , 'ताई माई अक्का विचार करा पक्का ...वरच मारा शिक्का,अरे हा आवाऽऽज कोणाचा,गली गली मे शोर है .... चोर है , 'कोण म्हणते येणार नाय आल्या शिवाय राहणार नाय','हमारा का नेता कैसा हो अमुक तमुक के जैसा हो'. निवडणुका आल्या म्हणजे काही महिने आधी (हो काही महिने आधीच कारण त्याकाळी उमेदवारी लवकर जाहीर व्हायची) ह्या घोषणांनी गल्ली बोळ निनादून जायची.गल्लीतील लहान मुले तर ज्या पक्षाची गाडी प्रचाराला यायची त्यांच्या घोषणा देत गाडीमागे पळायचे.ह्या मुलांना बिचाऱ्यांना माहित सुद्धा नसायचे की निवडणुकीला कोण उभा आहे,आपण ज्याच्या घोषणा देत आहो तो उमेदवार कुठल्या पक्षाचा आहे.मात्र एकूणच माहोल हा लहानथोरांसाठी करमणुकीचा असायचा.निवडणूक लोकसभेची असो की विधानसभेची की आणखी कुठली घोषणा देणारे आणि घोषणा ह्या सारख्याच असायच्या तसेच पक्षाचे निशाणी सुद्धा तीच असायची.मात्र एवढ्या सगळ्या गदारोळात सुद्धा प्रतिस्पर्ध्यावर कधीच खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जात नव्हती.मात्र काळ बदलला आचारसंहितेचे नियम अधिक कडक झाले आणि प्रचाराचा कालावधी कमी झाला. पारंपरिक प्रचाराची जागा आता आधुनिक तंत्रज्ञानाने घेतली ज्यामुळे एका क्लिकने लाखो लोकांपर्यंत पोहोण्याची सोय झाली.
सोशल मीडियाचा प्रचारात शिरकाव
२०१४ ची निवडणूक अनेक बाबीत लक्षात राहण्यासारखी ठरली. या निवडणुकीत काँगेसचे सरकार जाऊन भारतीय जनता पक्षाचे सरकार आले हा एवढाच बदल झाला नाही तर निवडणुकीचे तंत्रच बदलून गेले. पारंपरिक प्रचाराला छेद देऊन तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर या निवडणुकीत झाला.खरे तर याची सुरुवात त्यापूर्वीच अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या निवडणुकीतच केली होती.तेव्हा लोकांना सोशल मीडियाचा वापर निवडणुकीसाठी करता येतो हे दिल्लीच्या निवडणुकीनंतरच कळले.त्यानंतर सोशल मीडिया सेल ,वॉर रूम आदींमुळे टेक्नोसॅव्ही तरुणांची भरतीच विविध राजकीय पक्षांनी सुरु केली.स्वतंत्र यंत्रणाच यासाठी कार्यान्वित केली गेली.२०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत तर पारंपरिक प्रचाराची जागा पूर्णपणे सोशल मीडिया प्रचाराने घेतली. प्रत्येक इच्छुक उमेदवाराने आपापले सोशल मीडिया सेल वर्षभर आधीपासूनच कार्यान्वित केले.थेट मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठीचा पर्याय म्हणून सगळ्याचा राजकीय पक्षांनी याचा पुरेपूर वापर करायला सुरुवात केली.ही सोशल मीडिया आणि आधुनिक तंत्रज्ञानाची कमाल आहे.
सोशल मीडियाचा अतिरेक
ज्या ठिकाणी प्रतिस्पर्धी असतो त्या ठिकाणी आरोप-प्रत्यारोप हे आलेच. या सोशल मिडीयाच्या माध्यमातून तर काहीवेळा अगदी खालच्या पातळीवर जाऊन सुद्धा एकमेकांवर टीका करण्याचे प्रयत्न झाले.सकाळ पासून तर रात्री उशिरांपर्यंत हा एकतर्फी मारा 'सोशल मीडिया'च्या माध्यमातून मतदारांवर होत असतो. निवडणुकीच्या काळात तर फेसबुक आणि व्हॉट्सअप वर फक्त प्रचाराचेच मेसेज ,कार्टून्स आणि व्हिडिओ क्लिप्स फिरत असतात. आपली इच्छा नसताना सुद्धा अनेकवेळा आपल्याला हे मेसेज पाठविले जातात.त्यामुळे अनेक वेळा मतदारांवर याचा उलटा परिणाम सुद्धा होत असल्याचे दिसत आहे.अनेकजण तर उघडपणे आता या राजकीय पक्षाच्या सोशल मीडिया प्रचाराला वैतागले असल्याचे बोलतात.काय खरे आणि काय खोटे हेच मतदाराला काळात नाही.या सोशल मीडिया प्रचार तंत्रामुळे उमेदवाराचे मतदारांशी थेट संभाषण कमी झाले.काळाची गरज आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचे हक्काचे साधन म्हणून सगळेच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा खुबीने वापर करताना दिसत आहेत.मात्र हा सोशल मीडिया मतदारांना किती सोसेल याचाही विचार राजकीय पक्षांनी करायला हवा.