Vidhan Sabha 2019 : ४० तरुण चेहऱ्यांना काँग्रेस देणार संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 04:53 AM2019-09-17T04:53:13+5:302019-09-17T04:54:03+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे जागा वाटप निश्चित झाले
- अतुल कुलकर्णी
मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे जागा वाटप निश्चित झाले असून प्रत्येकी १२५ जागा लढवाव्यात यावर दोन्ही पक्षाच्या नेत्यांचे एकमत झाले आहे. १२५ पैकी ४० जागांवर तरुण चेहरे देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.
काँग्रेस पक्षाकडील १२५ पैकी ६१ मतदारसंघाची नावे केंद्रीय निवड समितीत अंतिम करण्यात आली असून उर्वरित नावे १८ सप्टेंबर रोजी दिल्ली येथे होणाºया बैठकीत चर्चेला घेतली जातील. छाननी समितीचे अध्यक्ष ज्योतिरादित्य शिंदे यांनीच वयाच्या बाबतीत स्पष्ट भूमिका घेतल्याचे सुत्रांनी सांगितले. ज्या ठिकाणी वयस्क, अथवा अती वयस्क उमेदवार किंवा विद्यमान आमदार असतील आणि तेथे पक्षाकडे दुसरा उमेदवारच नसेल अशा ठिकाणांची यादी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र जेथे तरुण चेहरे पक्षाकडे असतील तेथे त्यांनाच प्राधान्य द्या, असे सांगण्यात आले आहे. त्यानुसारच ४० तरुण चेहरे निश्चित करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आमच्याकडील अनेक नेते भाजप शिवसेनेत गेल्यामुळे तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. त्यामुळे त्यांना आपले नेतृत्व सिध्द करण्याची संधी मिळणार आहे.
अनेक तरुण नेते पंचायत समिती, जिल्हापरिषद पातळीवर चांगले काम करत आहेत पण विद्यमान नेतृत्वामुळे त्यांना संधी मिळत नव्हती, ती आता त्यांना चालून आली आहे.
जे गेले त्यांनी उलट या तरुणांना मदत करण्याचेच काम केले आहे, आता हे तरुण आपण काय करु शकतो हे दाखवून देतील असेही तांबे यावेळी म्हणाले.
>मंगळवारी काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक
आघाडीच्या जागा वाटपात ३८ जागा मित्रपक्षांसाठी देण्यात येणार असून त्यात समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट, रिपाइं (गवई गट), रिपाइं (कवाडे गट), शेतकरी कामगार पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा समावेश असून दोन्ही पक्षाच्या नेत्यांची बसपासोबत चर्चा सुरु आहे. मंगळवारी काँग्रेस व राष्टÑवादीच्या नेत्यांची मुंबईत बैठक होत आहे.