नितीन काळेलSatara Vidhan Sabha 2024: विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारपासून रणधुमाळी सुरू होत असून प्रत्यक्षात अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. यामुळे पहिल्या दिवशी अर्ज कोण-कोण भरणार, त्यामध्ये दिग्गज असणार का ? याकडे लक्ष लागलेले आहे. तर निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात भाजप आणि वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेतलेली आहे.
विधानसभा निवडणूक जाहीर होऊन सहा दिवस होऊन गेले आहेत. तरीही अजून महायुती तसेच महाविकास आघाडीतील जागा वाटप निश्चित नाही. काही जागांवर एकमत असले तरी अनेक जागांचा तिढाच आहे. त्यामुळे दावे-प्रतिदावे असणाऱ्या जागां वाटपाचं गुऱ्हाळ सुरूच आहे. त्यातच महायुतीत विद्यमान आमदारांचे मतदारसंघ त्याच पक्षाकडे राहणार हे जवळपास स्पष्ट आहे.
त्यामुळे भाजपने पहिली यादी प्रसिद्ध करीत सातारा जिल्ह्यातील तीन मतदारसंघाचे उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात विद्यमान दोन आमदारांवरच पुन्हा शिक्कामोर्तब केलंय. तसेच कऱ्हाड दक्षिणमध्ये भाजपने पुन्हा अतुल भोसले यांनाच पसंती दिली आहे.
आता २२ ऑक्टोबरपासून प्रत्यक्षात निवडणुकीला सुरूवात होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा पहिला दिवस आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी अर्ज भरण्यासाठी कोण-कोण पुढे येणार हे पाहणे महत्वाचे आहे.
जिल्ह्यात आठ मतदारसंघ असून आतापर्यंत भाजपचे तीन उमेदवार जाहीर झाले आहेत. सातारा, कऱ्हाड दक्षिण आणि माण मतदारसंघाचा समावेश आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीनेही माण, कऱ्हाड दक्षिण आणि कोरेगावच्या उमेदवाराची घोषणा केलेली आहे. यामधील कोण पहिल्या दिवशी अर्ज भरणार याकडेही लक्ष असणार आहे.