Maha Vikas Aghadi Maharashtra Election 2024: लोकसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीमध्ये सांगली मतदारसंघाबद्दल काय घडलं, ते सगळ्या महाराष्ट्राने पाहिले. काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या या जागेवर ठाकरेंनी दावा केला आणि जागावाटपा आधीच उमेदवारही जाहीर केला. काँग्रेसच्या नेत्यांनी आणि मतदारांनी आघाडी धर्म बाजूला ठेवून अपक्ष विशाल पाटलांना विजयी केले. यालाच सांगली पॅटर्न म्हटलं गेलं. असेच काही राजकीय स्थिती सांगोला विधानसभा मतदारसंघात निर्माण झाली आहे. ठाकरेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या दीपक साळुंखे यांना उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडणार, हे स्पष्ट झाले आहे.
शिवसेनेची जागा, पेच काय?
सांगोला मतदारसंघातून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे शहाजीबापू पाटील निवडून आले होते. शिवसेनेतील फुटीनंतर ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेले. त्यामुळे ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.
गेल्यावेळी शिवसेनेने ही जागा जिंकलेली असल्याने ठाकरेंनी या जागेवर दावा केला आहे. दुसरीकडे शेतकरी कामगार पक्षाचा हा परंपरागत मतदारसंघ आहे. स्वर्गीय गणपतराव देशमुखांना या मतदाराने विजयी केले आहे. २०१९ मध्ये त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आणि शहाजीबापू पाटील अवघ्या काही मतांनी विजयी झाले. या जागेसाठी शेतकरी कामगार पक्ष आग्रही आहे.
शेतकरी कामगार पक्षाचा दावा
गेल्यावेळी शेतकरी कामगार पक्षाकडून अनिकेत देशमुख यांनी निवडणूक लढवली. त्यांना ९८,६९६ इतकी मते मिळाली होती. विजयी झालेल्या शहाजीबापू पाटील यांना ९९,४६४ इतकी मते मिळाली होती. शहाजीबापू पाटलांनी ७६८ मतांनी देशमुखांचा पराभव केला होता.
यावेळी ज्यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत, ते दीपक साळुंखे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढले होते. त्यांना ९१५ मते मिळाली होती.
सांगोलामध्ये जागावाटपाचा वाद काय?
शेतकरी कामगार पक्षाकडून अनिकेत देशमुख यांनी पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याचे स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणुकीवेळीच शरद पवारांनी त्यांना आपल्या बाजूने घेतले होते. त्याचवेळी सांगोलातून ते महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, अशी चर्चा झाली होती.
आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने साळुंखे यांना प्रचाराला लागण्याचे सांगितल्यानंतर अनिकेत देशमुख यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. शेतकरी कामगार पक्षही यामुळे नाराज आहे. दोन्ही शिवसेना उमेदवार आणि शेकापचे अनिकेत देशमुख अशी तिहेरी लढत या मतदारसंघात असेल.
शेकापने महाविकास आघाडीत राहून अनिकेत देशमुखांना ताकद दिली, तर त्याचा सगळ्यात जास्त फटका ठाकरेंच्या उमेदवारालाच बसेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे माजी आमदार स्व. गणपतराव देशमुख यांच्याबद्दल या मतदारसंघात आदर आणि सहानुभूती आहे. त्याचा फायदाही अनिकेत देशमुख यांना होईल. यात आणखी एक फॅक्टर म्हणजे काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ठाकरेंच्या उमेदवाराला किती साथ देतील, हाही असेल. त्यामुळे सांगोलामध्ये पुन्हा सांगली पॅटर्न होऊ शकतो, ही चर्चा जोरात सुरू झाली आहे.