Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 07:18 PM2024-10-22T19:18:06+5:302024-10-22T19:18:38+5:30
मुकुंद पाठक, सिंदखेडराजा Vidhan Sabha election Maharashtra 2024:लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघात शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे ...
मुकुंद पाठक, सिंदखेडराजा
Vidhan Sabha election Maharashtra 2024:लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघात शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधून निवडणूक लढवली. त्याच पद्धतीचा राजकीय पॅटर्न सिंदखेडराजा मतदारसंघात पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवारांसोबत गेलेल्या राजेंद्र शिंगणेंनी विधानसभा निवडणूक जाहीर होताच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उडी मारली. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा मजबूत असलेल्या सिंदखेडा राजा मतदारसंघावर महायुतीतील इतर मित्रपक्षांनी दावा करण्यास सुरुवात केली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात एकमेव असलेल्या या मतदारसंघावरील आपला दावा सोडण्यास साफ नकार दिला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील पेच महायुतीला सोडता आलेला नाही.
आपलाच उमेदवार निवडणूक लढवणार
आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पक्षातील एक्झिटनंतर अजित पवार पक्षाकडे उमेदवार कोण असेल, याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यातच काझी हेच निवडणूक लढवतील, अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र, पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही काम करणार असल्याचे सांगून काझी यांनी वरिष्ठांकडे याचा निर्णय टोलवला आहे.
भाजपा, काँग्रेस व शिंदेसेना पक्षातील इच्छुक उमेदवारांच्या मुंबईत गाठीभेटी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) याच पक्षांतून आयात केलेल्याला उमेदवारी देईल, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
सिंदखेडराजा विधानसभा हे आहेत उमेदवारीसाठी इच्छुक
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, भाजपचे ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनील कायंदे, युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव मनोज कायंदे या तीन प्रमुख उमेदवारांची या मतदारसंघात लढण्याची इच्छा लपून राहिलेली नाही.
राजकीय समीकरणे तपासून या उमेदवारांनी आजपर्यंत आपल्या उमेदवारीचा आग्रह सोडलेला नाही. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मतदारसंघावरील आपला दावा सोडणार नसल्याने येथे पेच आहे.