मुंबई – विधिमंडळ अधिवेशाच्या दुसऱ्या दिवशी भाजपा आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर प्रतिविधानसभा भरवली होती. या कृतीवरून विधानसभेत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी आक्षेप घेतला. विधान भवन परिसरात कुठल्याही संविधानिक कामकाजाशिवाय इतर कामकाज होऊ शकत नाही. विरोधी पक्षांचा आंदोलन करण्याचा अधिकार आहे. परंतु स्पीकर लावून भाषणबाजी करणं यासाठी विधानभवन परिसराचा राजकीय वापर केला जातोय असा आरोप भास्कर जाधव यांनी केला.
भास्कर जाधव यांच्या आक्षेपानंतर नवाब मलिक यांनीही अशाप्रकारे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर स्पीकर लावून आंदोलन करणे योग्य नाही. तात्काळ हे स्पीकर जप्त करण्यात यावे अशी मागणी केली. इतकचं नाही तर मंत्री जयंत पाटील यांनी ज्या ज्या सदस्यांनी माईकचा वापर केला त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. विधिमंडळ पायऱ्यांवर प्रतिविधानसभा सुरू आहे. माईक सुरू आहे. जर हे बंद होणार नसेल तर तर आपलं सभागृह थांबवूया. ताबडतोब हा प्रकार थांबवला पाहिजे अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. त्यानंतर तालिका अध्यक्षपदी भास्कर जाधव पुन्हा बसले. तेव्हा तातडीने स्पीकर जप्त करण्याचे आदेश त्यांनी दिली
काय म्हणाले भास्कर जाधव?
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर प्रतिविधानसभा भरवण्यात येते. स्पीकर लावले जातात. प्रत्येक वेळेला राजकारण केले जाते. आमचं केंद्रात सरकार आहे, आम्ही बोलू तसं वागू. मार्शल लावून या सगळ्यांना आवाराच्या बाहेर काढा असं माझं मत आहे. सभागृहात बसायचं नाही, महाराष्ट्राच्या हिताचे विषय मांडायचे नाही. आम्ही म्हणू ते करू, याला आत टाकू त्याला आता टाकू. ज्या गावच्या बाभळी त्या गावच्या बोरी त्यांच्यावर तात्काळ कारवाई करायलाच हवी अशी मागणी त्यांनी केली.
सरकारचा बुरखा फाडू – देवेंद्र फडणवीस
मार्शल पाठवून पत्रकारांवर दंडुकेशाही करण्याचा प्रयत्न केला गेला. आजचं अधिवेशन सुरु करतील. लोकशाहीच्या दोन्ही स्तंभांना कुलूप लावण्याचं काम ठाकरे सरकार करत आहे. सरकारकडून दडपशाहीचा वापर केला जात आहे. ज्यापद्धतीने सरकारने १२ आमदारांचे निलंबन केले. हे सरकार शेतकरी, ओबीसी, मराठा समाजाविरोधात आहे. सरकार विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकत नाही. खोटारडे आरोप लावून भाजपा आमदारांचे निलंबन केले गेले. प्रतिविधानसभा भरवली असताना माध्यमांचे कॅमेरा जप्त करण्यात आले. या सरकारचा बुरखा फाडण्याचं काम आम्ही करू, जनतेसमोर जाऊन आम्ही सरकारला उघडं पाडू असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला.