Sujay Vikhe Vidhan Sabha election : दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या सुजय विखे पाटील विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी सुजय विखेंनी तसे संकेत दिले होते. आता त्यांनी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे, याबद्दलची भूमिका स्पष्ट केली. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायला आवडेल, असे ते म्हणाले आहेत. भाजपने याला हिरवा कंदील दाखवल्यास बाळासाहेब थोरात विरुद्ध सुजय विखे पाटील अशी लढत महाराष्ट्राला बघायला मिळू शकते.
1985 पासून संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेल्या बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची इच्छा सुजय विखे-पाटील यांनी व्यक्त केली आहे. "पक्षाने आदेश दिल्यास संगमनेरमधून निवडणूक लढवायला आवडेल, इतर मतदारसंघातून नको", असे विधान सुजय विखे पाटील यांनी केले.
सुजय विखे विधानसभा निवडणूक लढवण्याबद्दल काय बोलले?
माध्यमांशी बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले, "भाजपाने आदेश दिला आणि जर पक्षाला ती जागा सुटली तर मला नक्कीच संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायला आवडेल. पक्षाचा जो काही आदेश असेल, त्यानुसार काम करत राहू."
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर सुजय विखे पाटील राहता विधानसभा मतदार सक्रिय झाल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी असल्याबद्दल भूमिका मांडली होती.
"मला आता वेळ आहे. शेजारी कुठे संधी मिळाली, तर विधानसभा लढवण्याचा माझा प्रयत्न आहे. ज्या मतदारसंघात माझ्या नावावर एकमत होईल, तिथून निवडणूक लढवण्यास तयार आहे. श्रीरामपूर राखीव असल्याने संगमनेर आणि राहुरी हेच माझ्यासमोर पर्याय आहेत", असे सुजय विखे म्हणालेले.
बाळासाहेब थोरात लढणार की जयश्री थोरात?
बाळासाहेब थोरात हे संगमनेर विधानसभा मतदारसंघातून १९८५ पासून निवडून येत आहे. ९ वेळा त्यांनी विधानसभेत या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांची मुलगी भाग्यश्री थोरातही राजकारणात सक्रीय झाल्या आहेत. त्या निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा अधूनमधून होत असते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत संगमनेरमधून काँग्रेसचा उमेदवार कोण असणार, याबद्दलही बोलले जात आहे.