महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही, सर्व पूल भक्कम - संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 03:53 PM2020-08-13T15:53:04+5:302020-08-13T15:54:08+5:30
उद्धव ठाकरे सरकारला १७० आमदारांचा पाठिंबा आहे. या सरकारला कोणताही धोका नाही, असे संजय राऊत म्हणाले.
मुंबई : बिहारमध्ये पूल पडले आहेत. आधीच्या सरकारने बांधलेले पूल पडले आहे. मात्र, आमच्या सरकारला कोणताही धोका नाही. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे पाच वर्षे चालणार असून सर्व पूल भक्कम आहेत, असे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शरद पवारांच्या पाठिंब्याने हे सरकार पाच वर्षे टिकणार आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली हे सरकार पाच वर्षे चालणार, यात आमच्या कोणाच्याही मनात काही शंका नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले. याचबरोबर, यावेळी संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला. विरोधकांनी आम्हाला कोणतेही सल्ले देऊ नयेत. उद्धव ठाकरे सरकारला १७० आमदारांचा पाठिंबा आहे. या सरकारला कोणताही धोका नाही, असे संजय राऊत म्हणाले.
याशिवाय, बुधवारी शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार यांचे चांगलेच कान उपटले. यावर अजित पवार नाराज आहेत का? असा सवाल संजय राऊत यांना केला. त्यावर संजय राऊत म्हणाले, "अजित पवार हे सरकारचा आधार आहेत. ते शरद पवारांच्या वक्तव्यामुळे नाराज नाहीत. शरद पवार यांनी त्यांच्या नातवाबाबत केलेले विधान हे त्यांचे व्यक्तीगत आहे. यावर मी काय बोलणार. त्यामुळे अजित पवार या सगळ्यामुळे नाराज आहेत, अशा चर्चांना काहीही अर्थ नाही."
दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवारांचे चांगलेच कान उपटले. पार्थ पवारांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी बुधवारी पार्थ पवार यांना फटकारले. यानंतर राजकीय वातावरणात याविषयावर विविध चर्चांना उधाण आले आहे.
आणखी बातम्या...
शरद पवार कुटुंबप्रमुख, प्रत्येकाला सूचना करण्याचा अधिकार; पार्थ प्रकरणावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया
‘मीच फक्त मॅच्युअर’ असा माझा दावा नाही - शौमिका महाडिक; शरद पवार यांच्या विधानावर टीका
पार्थ पवार अपरिपक्व, मागणीला कवडीची किंमत देत नाही - शरद पवार