महाविकास आघाडीच्या नगरसेवकांत जुंपली, एकमेकांना शिवीगाळ; भाजपाने केली मध्यस्थी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 06:29 PM2021-02-12T18:29:53+5:302021-02-12T18:32:57+5:30
Thane politics News: स्थायी समितीत अर्थसंकल्पावरील चर्चा सुरु असताना नगरसेवकांमध्ये थेट अंगावर खुर्ची फेकेपर्यंत राडा झाला. यावेळी सभागृहात महिला सदस्य देखील उपस्थित होत्या. परंतु हे सदस्य त्याचेही भान विसरल्याचे दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मागील दोन दिवसापासून स्थायी समितीत अर्थसंकल्पावरील चर्चा सुरु आहे. मात्र शुक्रवारी ही चर्चा सुरु असतांना महाविकास आघाडातील कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये थेट अंगावर खुर्ची फेकेपर्यंत राडा झाला. तसेच शिविगाळ आणि शाब्दीक चकमकही झाली. यावेळी सभागृहात महिला सदस्य देखील उपस्थित होत्या. परंतु हे सदस्य त्याचेही भान विसरल्याचे दिसून आले. परंतु यामध्ये मध्यस्थी करुन भाजपने शिवसेना आणि कॉंग्रेसमधील वाद शमविल्याचे दिसून आले. या राडय़ानंतर मात्र ही चर्चा अर्धवट राहीली असून आता पुढील आठवडय़ात पुन्हा अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे.
एकीकडे राज्यात महाविकास आघाडीतील घटक पक्षात काही ना काही कुरबुरी सुरुच आहेत. त्यात ठाण्यातही शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये कुरबुरी वाढल्याचे दिसत आहे. एकीकडे आता आम्हाला ख:या अर्थाने विरोधी पक्षनेता भेटल्याचा दावा राष्ट्रवादीकडून केला जात आहे. मागील काही दिवसापासून विरोधी पक्षनेते देखील शिवसेनेवर घसरल्याचे दिसत आहे. त्यामुळे या कुरबुरी सुरु असतांनाच आता शुक्रवारी अर्थसंकल्पावरील चर्चा स्थायी समितीच्या बैठकीत सुरु होती. गुरुवार पासून ही चर्चा सुरु असून शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता पुन्हा ही चर्चा पुढे सरकत होती. त्यानंतर दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास सुरळीतपणो सुरु असलेल्या चर्चेत अचानक शिविगाळीचे स्वरुप आल्याचे दिसून आले. कॉंग्रेसचा सदस्य वारंवार सभागृहात ये जा करीत होता. त्यानंतर त्याला बोलण्याची संधी मिळाल्यावर त्याने २०१८,१९ आणि २० च्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यास सुरवात केली. परंतु जुने विषय का उगाळता आताच्या बजेटवर चर्चा करा, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेवकाने केली. त्यावर कॉंग्रेसचा नगरसेवक आक्रमक झाला आणि मला जनतेने निवडुन दिले आहे, त्यामुळे मला काय बोलायचे हे शिकवू नये असा शाब्दीक टोला लगावला आणि येथूनच शिवसेना आणि कॉंग्रेसच्या दोन नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दीक चकमक झाली. ही चकमक एवढी भंयकर होती, ती हे दोनही सदस्य सभागृहात महिला सदस्य आणि पालिकेच्या महिला अधिकारी सभागृहात आहेत, याचेही भान विसरुन एकमेकांना शिविगाळ केल्याचे दिसून आले. त्यानंतर हा वाद एवढा वाढला की कॉंग्रेसच्या नगरसेवकाने शिवसेनेच्या नगरसेवकावर थेट खुर्ची फेकण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान हा राडा सुरु असतांनाच आणि खुर्ची भिरकण्याचा प्रयत्न सुरु असतांनाच भाजपच्या सदस्याने कॉंग्रेसच्या सदस्याच्या हातातील खुर्ची खेचून घेतली आणि त्याला बाहेर नेले. त्यानंतर काही वेळाने हा वाद शांत झाला. परंतु तो र्पयत ही अर्थसंकल्पावरील चर्चा थांबविली गेली आणि आता पुढील आठवडय़ात यावर चर्चा होणार आहे. या नंतर या दोघांनी एकमेकांची माफी मागितल्याची माहिती सुत्रंनी दिली. परंतु हे प्रकरण एवढे तापले होते की, महापौर दालनातही कॉंग्रेसचा नगरसेवक गेला तेव्हा, त्याला महापौरांनी समज दिल्याची माहिती समोर आली आहे. तुम्ही असे भांडत राहिलात तर महाविकास आघाडीला ते परवडणारे नाही, असेही त्यांनी सांगितले. विरोधकांना यामुळे आयते भांडवल मिळेल त्यामुळे यापुढे असे होता कामा नये अशी तंबीही महापौरांनी दिल्याची माहिती सुत्रंनी दिली.