मुंबई - शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरुद्ध ईडी सुडापोटी कारवाई करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचा छापा पडल्याचे वृत्त मी पाहिले आहे. सरनाईक हे सातत्याने कंगना आणि अर्णबच्या प्रकरणात महाराष्ट्राच्या बाजूने बोलत होते म्हणूनच त्यांच्यावर ईडी कडून छापा टाकला गेला असल्याचा दावा छगन भुजबळांनी केला.
पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ यांनी भाजपावर निशाणा साधला, भुजबळ म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, जे स्वप्नरंजन करुन घेत असेल आणि त्यात त्यांना आनंद मिळत असेल तर त्यांचा आनंद आपण का भंग करावा? भाजपाला सरकार पडण्याची स्वप्ने पडत असतील तर त्यांनी जरूर स्वप्ने पाहावी असा टोला त्यांनी लगावला.
तसेच विरोधीपक्षातील एखादा नेता जो व्यक्ती केंद्रसरकारच्या विरोधात जास्त बोलेल त्याला ईडीची भीती दाखवली जात आहे. मी बोललो म्हणून माझ्यावर केसेस दाखल केल्या. पवार साहेब निवडणुकीच्या काळात बोलले तर त्यांना नोटीस पाठवली जात आहे. त्यामुळे सुडापोटी ही कारवाई केली जात असल्याचं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं.
सरनाईकांवरील कारवाई दुर्दैवी – काँग्रेस
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, ही कारवाई दुर्दैवी आणि आक्षेपार्ह आहे. केंद्रातील भाजप सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असून भाजपाविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ईडी, सीबीआय, सारख्या केंद्राच्या तपास यंत्रणाचा राजकीय कारणांसाठी वापर करुन विरोधकांना धमकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशी कारवाई भाजपाशासित राज्यात झाल्याचे दिसत नाही असंही त्यांनी नमूद केले.
आम्हाला कोणाच्या बापाला घाबरत नाही; संजय राऊत आक्रमक
कितीही प्रयत्न केला तरी हे महाविकास आघाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. तुम्ही सुरुवात केली असेत तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. आमच्या मंत्री, आमदारांच्या घराबाहेर ईडीनं कार्यालयं थाटली, तरीही आम्ही घाबरत नाही. ईडी एखाद्या राजकीय पक्षाची शाखा असल्याप्रमाणं काम करतेय, अशी टीका त्यांनी केली.
सरनाईक यांच्यावर कार्यालयावर कारवाई हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. कितीही दबाव आणला तरी महाविकास आाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. सरकारी संस्थांच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र सुरुवात तुम्ही केली असेल तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे. ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे. मात्र अशा कारवाया करून पुढची २५ वर्षे भाजपाचे महाराष्ट्रात सरकार येणार नाही. तसेच सरकारी संस्थांनी राजकीय शाखा असल्यासारखे वागू नये, असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला आहे.