मुंबई – शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रानंतर आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत पावसाळी अधिवेशन, महामंडळांवरील नियुक्त्या यासह अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रताप सरनाईक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर गंभीर आरोप करत महाविकास आघाडी शिवसेनेला कमकुवत करतेय असा दावा केला होता. त्यानंतर मंगळवारी झालेल्या आघाडीच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं होतं.
सह्याद्री अतिथीगृहावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. महाविकास आघाडीत कोणताही वाद नाही. आघाडीतला समन्वय उत्तम सुरू आहे. काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला यात गैर काय? प्रत्येकाला आपापला पक्ष मोठा करण्याचा अधिकार आहे. महाविकास आघाडीत कोणताही पक्ष नाराज नाही. सरकार ५ वर्ष चालेल. बैठकीत सरनाईक यांच्या पत्रावर कोणतीही चर्चा झाली नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच आजच्या बैठकीत महामंडळाच्या वाटपाबाबत अंतिम यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवली जाईल. महामंडळाचं वाटप समसमान करण्यात आलं आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष यावर एकमत झालं आहे त्याला अंतिम स्वरुप देण्यात आलं आहे असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार शिर्डी संस्थानचं अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं अध्यक्षपद काँग्रेसला देण्याचं बैठकीत ठरल्याचं समजतं.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्य मार्गदर्शनाखाली सरकार चांगले काम करत आहे. राज्य सरकारच्या कुठल्याही निर्णयात मतभेद नाहीत. मुख्यमंत्र्यांचे कामाचे विविध स्तरातून कौतुकही होत आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“सरकार आहे की तमाशा, आता शांत बसणार नाही”
तीन पक्षांमध्ये विसंवाद आहे, तीन पक्षांत एकमेकांबद्दल विश्वास नाही हे सर्व स्पष्टच आहे. पण, तिघांच्या भांडणात जनतेला का खड्ड्यात टाकताय. तुम्ही एकमेकांना जोडे मारा, हार घाला, गळे मिळा. पण तुमच्या राजकारणासाठी जनतेचा बळी देणं अत्यंत चुकीचं आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचं आरक्षण गेलं, मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात हार स्विकारावी लागली. पण, या सरकारचे मंत्री स्वत:च मोर्च काढतात अन् कोर्टात बाजू मांडत नाहीत. त्यामुळे हे सरकार आहे की तमाशा अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.