नागपूर - भाजपाचे नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सत्ताधारी महाविकाआघाडीच्या मंत्र्यांवर गंभीर आरोप केला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी अवैध व्यवसायांसाठी जिल्हे वाटून घेतले आहेत असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.महाविकास आघाडी सरकारवर मोठा आरोप करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाला हाताशी धरून वाळूचोरी, तस्करी या प्रकारचे धंदे सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी अवैध व्यवसायांसाठी जिल्हे वाटून घेतले आहेत. रेती वाहतूक करणाऱ्या गाड्या अ़डवायच्या नाहीत, असा एसपी आणि कलेक्टरांना अलिखित आदेश देण्यात आलेला आहे. आमचे कार्यकर्ते बिनधास्त गाड्या चालवतील, असा कारभार चालला आहे. सर्वांनी जिल्हे वाटून घेतले आहेत. अवैध दारूची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामधून मोठी कमाई केली जात आहे, असा आरोप बावनकुळे यांनी केला.दरम्यान, बावनकुळे यांच्या आरोपाला महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना सत्तेत असताना चालवलेल्या अवैध धंद्यांची आठवण येत असावी. बावनकुळे यांनी केलेले आरोप सिद्ध करावेत. तसेच असे आरोप करताना भान ठेवावं, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.