Maharashtra Assembly Elections 2024 Explained: अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. २८८ मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीचे निकाल आणि काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी कोणत्या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीची स्थिती कशी आहे, जाणून घेऊयात...
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोणाला किती जागा?
२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत फूट पडलेली नव्हती. त्यावेळी भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. भाजपाला १०५, शिवसेना ५६, राष्ट्रवादी काँग्रेस ५४, काँग्रेस ४४, इतर २९ जागा अशी स्थिती होती. त्यानंतर राजकीय समीकरणे बदलली.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यानंतर पहिली निवडणूक झाली, ती लोकसभेची. या निवडणुकीत महायुतीची पिछेहाट झाली. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. काही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मताधिक्य मिळालेले आहे. तर काही मतदारसंघांमध्ये महायुतीला मताधिक्य मिळाले आहे. पण, ही आकडेवारी बघितली तर महाविकास आघाडीची बाजू वरचढ दिसते.
विदर्भ : लोकसभा निवडणुकीत कोणत्या विधानसभा मतदारसंघात कुणाला मताधिक्य?
विदर्भातील विधानसभेच्या ६२ जागांपैकी १५ जागांवर भाजपाला मताधिक्य मिळालेले आहे. शिवसेनेला ४ जागांवर मताधिक्य मिळाले. काँग्रेसला २९ मतदारसंघात, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला ५, शिवसेना यूबीटी पक्षाला ८ जागांवर मताधिक्य मिळालं होतं.
पश्चिम महाराष्ट्र : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी
पश्चिम महाराष्ट्रात ७० जागांपैकी भाजपाला १७ जागांवर, ११ जागांवर शिवसेना, २ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस, १९ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, ६ जागांवर शिवसेना यूबीटी पक्ष आणि ५ अन्य पक्षांना मताधिक्य मिळालं होतं.
उत्तर महाराष्ट्रात काय होती स्थिती?
उत्तर महाराष्ट्रामध्ये ३५ जागा आहेत. त्यापैकी २० जागांवर भाजपा, २ जागांवर शिवसेना, ५ जागांवर काँग्रेस, ४ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, ४ जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेला मताधिक्य मिळालं होतं.
मराठवाड्याबद्दल सांगायचं म्हणजे या विभागात ४६ जागा आहेत. त्यापैकी ८ जागांवर भाजपाला, ४ जागांवर शिवसेनेला, १४ जागांवर काँग्रेसला, ३ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, १५ जागांवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला, तर २ जागांवर अन्य पक्षांना मताधिक्य मिळाले.
ठाणे कोकणात कोणाला मताधिक्य?
ठाण्यासह कोकण विभागात ३९ जागा आहे. त्यापैकी ११ जागांवर भाजपाला, १२ जागांवर शिवसेनेला, ४ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस, २ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, ९ जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेला, तर १ मतदारसंघात अपक्षांना मताधिक्य मिळालं होतं.
मुंबईतील ३६ जागांपैकी ९ जागांवर भाजपा, ७ जागांवर शिवसेना, ५ जागांवर काँग्रेस, १५ जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेला मताधिक्य मिळालं होतं.
या सगळ्या विभागाचा विचार केला, तर भाजपाला ८० जागांवर मताधिक्य मिळालं होतं. शिंदेंच्या शिवसेनेला ४० जागांवर, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ६ जागांवर, काँग्रेसला ६३ जागांवर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ३३ जागांवर, तर ठाकरेंच्या शिवसेनेला ५७ जागांवर मताधिक्य मिळालं होतं. ९ जागांवर अन्य पक्षांना मताधिक्य मिळालं होतं.