Mahayuti Seat Sharing Update: २२ ऑक्टोबरपासून विधानसभा निवडणुकीचे अर्ज भरण्यास सुरूवात झाली. तरी महायुतीतील पूर्ण जागांचा गुंता सुटला नसल्याचे दिसत आहे. ज्या जागांचे वाटप झाले, त्या मतदारसंघातील उमेदवार तिन्ही पक्षांनी जाहीर केले आहेत. पण, १०६ मतदारसंघांचा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. यातील कोणता मतदारसंघ महायुतीत कोणाला जाणार आणि उमेदवार कोण असणार, यामुळे तिन्ही पक्षातील इच्छुकांची अस्वस्थता वाढली आहे. सर्वाधिक विदर्भातील २८ मतदारसंघाचे जागावाटप जाहीर झालेले नाही.
२८८ पैकी 182 जागांचे वाटप
दिल्लीत अमित शाहांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली होती. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस म्हणालेले की, ज्या जागांचे वाटप झाले आहे, त्या मतदारसंघातील उमेदवार तिन्ही पक्ष आपापल्या सोयीने करणार आहेत.
त्यानंतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली. भाजपाने पहिल्या यादीत ९९ उमेदवारांची घोषणा केली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ४५, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ३८ उमेदवारांची घोषणा केली.
कोणत्या विभागात किती जागांचे वाटप नाही?
कोकणातील १५ जागांचे वाटप झालेले नाही. मुंबईतही १६ जागांचे वाटपाबद्दल गुंता आहे. मराठवाड्यातील १४ जागा, उत्तर महाराष्ट्रातील ९ जागा, विदर्भातील २८ जागा आणि पश्चिम महाराष्ट्रातील २४ जागांचा गुंता अजून कायम आहे. या जागांपैकी कोणाला किती जागा मिळतील, याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.
महायुतीने आतापर्यंत १८२ जागांचे वाटप जाहीर केले आहे. १०६ जागांची अजून घोषणा व्हायची आहे. १८२ पैकी सर्वाधिक ९९ जागा भाजपाला मिळाल्या आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेला ४५ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित १०६ जागामध्ये जास्त जागा कुणाला मिळणार याबद्दल उत्सुकता आहे.