Mahayuti Seat Sharing Updates: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जागावाटपाच्या चर्चेला वेग आला आहे. महाविकास आघाडी प्रमाणेच महायुतीतही काही जागांवरून पेच निर्माण झाला असून, यावर आता दिल्लीत चर्चा करून मार्ग काढला जाणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला रवाना झाले असून, तिन्ही नेत्यांची अमित शाहांसोबत बैठक होणार आहे.
महायुतीच्या जागावाटपाची लवकरच घोषणा केली जाईल, असे तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून सांगितले जात असले, तरी जागावाटपाचा पेच अद्याप सुटलेला नाही. महायुतीत काही जागांवरून पेच आहे. यासंदर्भात आता महायुतीतील तिन्ही प्रमुख पक्षाच्या नेत्यांची दिल्लीत आज (१८ ऑक्टोबर) रात्री बैठक होणार आहे.
एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना
शिवसेना मुख्य नेता आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. तिन्ही नेत्यांची केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासंदर्भात अमित शाहांसोबत चर्चा होणार असल्याचे समजते. त्याचबरोबर महायुतीत काही जागांवर तिन्ही पक्षांनी तर काही ठिकाणी दोन पक्षांनी दावे केले आहेत. त्यावरही तोडगा काढण्यासंदर्भात शाह यांच्यासोबत चर्चा होणार आहे.
लवकर जागावाटप निश्चित करून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्याचे प्रयत्न महायुतीकडून सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीतील जागावाटप प्रचंड रेंगाळलं होतं. त्याचा फटकाही मतदारसंघात बसला. ही चूक टाळण्याचा महायुतीचा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले. पुढील दोन दिवसांत महायुतीतील पक्षांकडून उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर केली जाऊ शक्यता आहे.