Mahayuti Bjp, Shiv Sena, Ncp Seat Sharing: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे महायुती-महाविकास आघाडीकडून जागावाटपाचा गुंता सोडवण्याला प्राधान्य दिलं जात असल्याचं दिसत आहे. महाविकास आघाडीची काही जागांवरील चर्चा सुरू असून, महायुतीचे जागावाटप जवळपास अंतिम झाल्याची माहिती समोर आली आहे. आजतक वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबद्दल महत्त्वाचे वृत्त दिले आहे.
काही दिवसांपूर्वी महायुतीच्या नेत्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर भाजपाने ९९ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. नव्या माहितीनुसार आता महायुतीचे जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे.
भाजपा १५६ जागा लढवणार?
विधानसभा निवडणुकीत भाजपाने शंभराच्या जवळ उमेदवार जाहीर केले आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार भाजपा २८८ पैकी १५६ जागा लढवणार आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ७८ ते ८० जागा मिळणार आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ५३-५४ जागा मिळणार असल्याची माहिती आहे.
विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावेळी जिंकून येण्याची शक्यता, २०१९ मधील लढलेल्या आणि जिंकलेल्या जागा, लोकसभा निवडणुकीतील कामगिरी आदी मुद्द्यांचा विचार केला गेला.
२०१९ मध्ये भाजपाने १०५ जागा जिंकल्या होत्या. सध्या त्यांचे १०३ आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ४० आमदार आहेत, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ४३ आमदार आहेत. पण, अजित पवारांच्य राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करता आली नाही.
पक्षांतराची लाट
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तयारी करत असलेल्या अनेकांचे मतदारसंघ जागावाटप मित्रपक्षांकडे गेल्याने पत्ते कट झाले आहेत. काहींना त्यांचा अंदाज आल्याने राज्यात पक्षांतराची लाट बघायला मिळत आहे. महायुतीत सत्तेमुळे मागील दोन अडीच वर्षात नेत्यांची रीघ लागली. पण, आता उमेदवारीसाठी नेते विरोधी महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये उड्या मारत असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर अनेक जण बंडाचे निशाण फडकावताना दिसत असून, निवडणुकीचा पारा चढू लागला आहे.