भोपाळ : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे २ वेळा मुख्यमंत्री राहिलेले मोतीलाल व्होरा यांचे ९३ व्या वर्षी निधन झाले. रविवारीच त्यांनी वाढदिवस साजरा केला होता. मोतीलाला व्होरा हे गांधी परिवाराचे जवळच्या नेत्यांपैकी एक होते. मोठ्या काळापासून ते पक्षाचे भांडार प्रमुख देखील राहिले आहेत. व्होरा हे छत्तीसगडहून राज्यसभा सदस्य होते. ते दोनदा मध्य प्रदेशचेमुख्यमंत्री देखील राहिलेले आहेत.
मोतीलाल व्होरा यांच्या बाबत राजकीय करिअरला एक कलाटणी देणारा किस्सा घडला होता. मोतीलाल व्होरा मुख्यमंत्री होण्याआधी अर्जुन सिंह यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. पहिल्यांदा ते १३ मार्च १९८५ ते १३ फेब्रुवारी १९८८ पर्यंत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले होते. दुसऱ्यांदा ते २५ जानेवारी १९८९ ला मुख्यमंत्री झाले होते. यावेळी त्यांचा कार्यकाळ ११ महिन्यांचा होता. ८ डिसेंबर १९८९ ला त्यांना खुर्ची सोडावी लागली होती. २०१९ मध्ये व्होरा यांना काँग्रेसचे अंतरिम अध्यक्ष बनविण्याची चर्चा होती.
मुख्यमंत्र्याची खूर्ची...१९८५ मध्ये विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर अर्जुन सिंह यांनी ९ मार्च १९८५ ला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर ते १० मार्चला राजीव गांधी यांच्याकडे मंत्रिमंडळाची यादी घेऊन गेले. परंतू राजीव गांधी यांच्या मनात काहीतरी वेगळेच सुरु होते. त्यांना मध्य प्रदेशच्या राजकारणात अर्जुन सिंह नको होते. राजीव यांनी यादी घेऊन आलेल्या अर्जुन सिंहांना दोन वाक्यांत वनवासात जाण्याचे आदेश दिले. ''तुमच्या पसंतीचा मुख्यमंत्री सुचवा आणि १४ मार्चला पंजाबला पोहोचा.'', असा तो आदेश होता. या आदेशामुळे अर्जुन सिंह यांना मोठा धक्का बसला होता. त्यांनी त्याच अवस्थेच राजीव गांधींना मोतीलाल व्होरा यांचे नाव सुचविले होते.
तिथूनच सिंह यांनी त्यांचा मुलगा अजय सिंह याला फोन करत मोतीलाल व्होरा यांना तातडीने विशेष विमानाने घेऊन दिल्लीला ये, असे सांगितले. अजय सिंह विषेश विमानाने व्होरा यांना घेऊन दिल्लीला रवाना झाले. व्होरा यांना काहीच कलत नव्हते. ते अजय सिंह यांना निदान मंत्री तरी बनवा अशी विनंती करत होते. अशातच विमान दिल्ली विमानतळावर लँड झाले. पंतप्रधान असलेले राजीव गांधी तेव्हा रशियाच्या दौऱ्यावर निघाले होते. विमानतळावरच दोघांची भेट झाली. व्होरा यांना पाहताच राजीव गांधी म्हणाले, तुम्ही मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहात. जबाबदारी स्वीकारा. यावेळी तिथे अर्जुन सिंह आणि दिग्विजय सिंह उपस्थित होते.
भलेही व्होरा मुख्यमंत्री झाले परंतू त्यांच्या मंत्रिमंडळात अर्जुन सिंह यांचेच समर्थक अधिक होते. पुढे तीन वर्षांनी सिंह वनवास संपवून परतले तेव्हा व्होरा यांना मुख्यमंत्रीपदाची खूर्ची सोडावी लागली. यानंतर ते राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात आरोग्य मंत्री झाले होते.