मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. यावेळी रामदास आठवले यांनी एक ट्विट करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काँग्रेसमध्ये विलीन करून शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष करा, अशी सूचना रामदास आठवले यांनी काँग्रेसला केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबात चर्चा सुरू आहे. यावरून रामदास आठवले यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. "काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सध्या राहुल आणि सोनिया गांधीही तयार नाहीत. माझी काँग्रेसला सूचना आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावे. याबाबतचा निर्णय पवार आणि काँग्रेस यांनी घ्यावा," असे ट्विट रामदास आठवले यांनी केले आहे.
काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच, गांधी घराण्याशिवाय एखादी व्यक्ती अध्यक्षपदी यावी, असेही त्यांनी म्हटले होते. मात्र, त्यासाठी कुणीही तयार झाले नाही. तर काँग्रेसच्या काही नेत्यांनी राहुल गांधी यांना अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली होती. मात्र राहुल गांधी यांनाही ती मान्य केली नाही.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी देशभरातील काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी पक्षात मोठ्या बदलाची गरज असल्याचे मत त्यांनी पत्रातून व्यक्त केले होते. पक्षाला पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्ष गरजेचा असल्याची महत्त्वाची मागणी या नेत्यांनी पत्रातून केली होती. यामध्ये काँग्रेस कार्यसमितीच्या अनेक सदस्यांसह, पाच माजी मुख्यमंत्री, खासदार आणि माजी केंद्रीय मंत्र्यांचा समावेश होता. त्यामुळे पक्षात वाद निर्माण झाला होता. मात्र, काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत सोनिया गांधी यांची पुन्हा पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली.
आणखी बातम्या...
- 'स्वत:हून नोकरी सोडा अन्यथा...', Oyo कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर ओढवले संकट
- "२०२४ आणि २०२९ मध्येही भाजपा जिंकणार", सुब्रमण्यम स्वामींचा मोदी सरकारला सल्ला
- "स्वत:चे ट्विटर हँडल स्वत: वापरावे, राजकीय पक्षांना देऊ नये", संजय राऊतांचा कंगना राणौतला टोला
- BSNL कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार, खर्चात काटकसर करण्याचे आदेश
- एकतर ती संस्कारानेच कृतघ्न किंवा मानसिक संतुलन ढासळलेले; धनंजय मुंडेंची कंगनाला चपराक
-'...अन्यथा कंगनाच्या सिनेमाचे सेट जाळून टाकू', करणी सेनेचा इशारा
- कंगनाने मुंबईला शहाणपण शिकवण्याची गरज नाही; भाजपाचा 'यू-टर्न'
- मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा; कंगनाचे खुले आव्हान