- हरिश गुप्तानवी दिल्ली : गुलाम नबी आझाद यांची मुदत संपल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ज्येष्ठ व विश्वासू नेते मल्लिकार्जुन खरगे यांना राज्यसभेतील पक्षाचे नेते करून पक्षातील असंतुष्ट मंडळींना जोरदार धक्का दिला आहे.राज्यसभेतील काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांना नेतेपद दिले जाईल, अशी चर्चा होती. ते स्वत:ही नेतेपदासाठी इच्छुक होते. मात्र त्यांना डावलण्यात आले आहे. राज्यसभेतून निवृत्त झालेल्या गुलाम नबी आझाद यांनी आनंद शर्मा यांनाच राज्यसभेतील नेतेपद द्यावे, अशी विनंती पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना केली होती. खरगे यांना नेतेपद दिल्याने आझाद यांची विनंती अमान्य झाली, हे उघड आहे. आनंद शर्मा यांना ते पद न देणे आणि आझाद यांची विनंती फेटाळून लावणे याचा अर्थ सोनिया गांधी यांनी असंतुष्टांना वा पक्षात वेगळी भूमिका मांडणाऱ्यांना दिलेला धक्का मानला जात आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात बदल करण्यात यावा, अशी भूमिका या दोघा नेत्यांसह अनेक मंडळींनी मध्यंतरी केली होती. तेव्हापासून ते असंतुष्ट म्हणून ओळखले जात आहेत. सोनिया गांधी यांनी शुक्रवारी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून मल्लिकार्जुन खरगे यांची नेतेपदी नेमणूक केल्याचे कळविले आहे.पी.चिदम्बरम व दिग्विजय सिंग हेही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. पण त्यांचाही सोनिया गांधी यांनी विचार केला नाही, हे स्पष्ट आहे. खरगे हे काँग्रेसचे राज्यसभेतील १७ वे नेते असतील. ते १६ फेब्रुवारी रोजी नेतेपदाची सूत्रे स्वीकारतील. ते राज्यसभेतील अधिकृत विरोधी पक्षनेतेही असतील.आझाद यांना मिळाला सर्वाधिक काळआझाद हे तब्बल पावणेसात वर्षे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते होते. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग पावणेसहा वर्षे, अरुण जेटली पाच वर्षे दोन महिने आणि जसवंत सिंह पाच वर्षे या पदी होते.
सोनिया गांधींनी दिला असंतुष्टांना धक्का; आझाद यांच्या निवृत्तीनंतर 'या' नावावर शिक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 3:54 AM