नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी चांगलेच राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला केला. राष्ट्रगीत बदलण्याच्या मागणीवरून त्यांनी हल्लाबोल केला आहे. "हिंमत असेल तर भाजपाने राष्ट्रगीत बदलून दाखवावं त्यांना योग्य उत्तर दिलं जाईल" असं खुलं आव्हान ममता बॅनर्जी यांनी दिलं आहे.
ममता यांनी भाजपाला समुदायांमध्ये दंगे आणि द्वेष पसरवणारा नवा धर्म असं देखील एका सभेला संबोधित करताना म्हटलं आहे. राष्ट्रगीत बदलण्यासंदर्भात भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक पत्र लिहिलं होतं. यावरही ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "जर भाजपाने असं काही करण्याचा प्रयत्न केला तर राज्यातील जनता त्यांना योग्य ते उत्तर देईल. ते आपल्या देशाचा इतिहास बदलू इच्छित आहेत. आपलं राष्ट्रगीत बदलण्याच्या गोष्टी करत आहेत" असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
"सीएए आणि एनपीआरमुळे कोणालाही घाबरण्याची गरज नाही"
ममता बॅनर्जी यांनी सीएए आणि एनपीआरच्या मुद्द्यावरही भाष्य केलं आहे. सीएए आणि एनपीआरमुळे कोणालाही घाबरण्याची गरज नाही. आम्ही पश्चिम बंगालमध्ये निर्वासितांच्या कॉलनींना मान्यता दिली आहे. भाजपा कधीही गोरखालँडबाबत समस्येचा कायमस्वरूपी तोडगा काढू शत नाही. केवळ तृणमूल काँग्रेसचं असं करू शकते असंही त्या म्हणाल्या आहेत. आयपीएस अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलावून केंद्र सरकार राज्याच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करत आहे असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर कोलकाता दौर्यात दगडांनी हल्ला करण्यात आला. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यावर ममता बॅनर्जी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ममता यांनी हे सगळं नाटक आहे. माध्यमाद्वांरे भाजपा नागरिकांना सभेपर्यंत आणू शकली नाही. यासाठीच हल्ल्याचा डाव रचला होता का? त्यांनी व्हिडीओ कसे काय तयार केले? बीएसएफ आणि सीआरपीएफची सुरक्षा असताना तुम्हाला कोणी हातही लावू शकेल का? असं ममता यांनी म्हटलं आहे. तसेच "देशाच्या गृहमंत्र्यांना काही काम नाही. उठसूठ पश्चिम बंगालमध्ये येतात. कधी कोण नेता तर कधी मंत्री येतात. आता चड्डा, नड्डा, फाड्डा, गड्डा आलेत. त्यांना राज्यात जनतेचं कुठलंही समर्थन नाही. यामुळे ते आपल्या कार्यकर्त्यांना नाटक करायला लावत आहे" असा हल्लाबोल ममता बॅनर्जी यांनी भाजपावर केला आहे.
'उठसूठ कोणीही बंगालमध्ये येतंय, चड्डा, नड्डा फाड्डा, गड्डा आलेत'; ममता बॅनर्जींचा हल्लाबोल
"हिटलर हा अशाच प्रकारे 'हिटलर' बनला. ते प्रत्येक गोष्टीचं नियोजन करत आहेत. आपले स्वतःचे व्हिडिओ रेकॉर्ड करत आहेत आणि माध्यमांकडे पाठवत आहेत. माध्यमांकडून हे व्हिडिओ दिवसभर चालवले जात आहेत. त्यांनी माध्यमांनाही विकत घेतलं आहे" असं देखील ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. यासोबत ममता बॅनर्जी यांनी नवीन संसद भवनच्या मुद्द्यावर सरकारवर निशाणा साधला आहे. नवीन संसद भवनची आता काहीच गरज नव्हती. हा पैसा शेतकऱ्यांना दिला गेला पाहिजे, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली.