कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी (West bengal Assembly Election 2021) अजून काही दिवस शिल्लक आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच आता रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रचारसभेला सुरूवात केली आहे. (Union minister Ramdas Athawale said, Mamata Banerjee impoverished Bengal during her 10 years in power)
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या 10 वर्षांच्या सत्ताकाळात पश्चिम बंगालला कंगाल केले आहे, अशी टीका रामदास आठवले यांनी केली आहे. आज पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील तारुकेश्वर विधानसभा मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार संजीव चक्रवर्ती यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
रामदास आठवले दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर येथे आले आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे 15 उमेदवार स्वबळावर निवडणूक लढत असून रिपाइं उमेदवारांच्या प्रचार दौऱ्यावर रामदास आठवले पश्चिम बंगालमध्ये आले आहेत. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा असून रिपाइं 15 जागा स्वबळावर लढत असून उर्वरित 279 जागांवर रिपाइंचा भाजपाला पाठिंबा आहे.
पश्चिम बंगालमध्ये दलितांची लोकसंख्या 36 टक्के असून दलितांचे मतदान निर्णायक ठरणारे आहे. ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसने बंगालला कंगाल केले आहे. मात्र, पश्चिम बंगालला सोनार बंगाल करण्यासाठी येथील दलिततांचा पाठिंबा भाजपाला मिळणार आहे. रिपब्लिकन पक्षाचे 15 उमेदवार विधानसभा निवडणूक लढत असून त्यात जे उमेदवार विजयी होतील त्यांचा भाजपाला पाठिंबा राहील, अशी घोषणा रामदास आठवले यांनी केली.
(निवडणुकीत 'जय श्रीराम'चा नारा; योगींनी चार सभेत 80 वेळा तर अमित शाहांनी 26 वेळा घेतले रामाचे नाव)
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला सोडून आता पर्यंत 64 आमदार बाहेर पडले आहेत. अनेक नेत्यांनी तृणमूल काँग्रेस पक्ष सोडला आहे. एखादा पक्ष सोडून एवढ्या मोठ्या प्रमाणात पदाधिकारी बाहेर पडण्याचे देशात तृणमूल काँग्रेस हे एकमेव उदाहरण आहे. त्यामुळे आता पश्चिम बंगालला सोनार बंगाल करण्यासाठी भाजपाला संधी मिळेल. पश्चिम बंगालचे दलित आणि अल्पसंख्यांक भाजपाला विजयी करतील. पश्चिम बंगाल च्या विकासासाठी रिपाइं आणि भाजपाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.