नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर ममता बॅनर्जींनी निशाणा साधला आहे. इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत ममता यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. केंद्र सरकारकडून आपल्याकडे बहुमत आहे आणि कृषी कायदे संसदेत मंजूर करण्यात आले आहेत असं सांगितलं जात आहे. यावर प्रश्न विचारला असता ममता बॅनर्जी यांनी "बहुमत तुम्हाला लोकांना मारण्याची परवानगी देत नाही" असं म्हणतं मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
ममता बॅनर्जी यांनी "बहुमत तुम्हाला लोकांना मारण्याची परवानगी देतं नाही. कृषी कायदे घाईत गडबडीत आणले गेले आहेत. कोरोना काळात आवाजी मतदानानं हे कायदे मंजूर करण्यात आले आहेत. मी केंद्र सरकारला विनंती करते की कृषी कायदे रद्द करावेत" असं म्हटलं आहे. तसेच माझे पंजाबमधील भाऊ आणि बहिणी एकजूट झाले आहेत. देशाच्या इतर भागातही हेच दिसत आहे. उद्धव ठाकरे, एम. के. स्टॅलिन आणि अरविंद केजरीवाल काय म्हणत आहे बघा. आम्ही सर्वजण एकजूट आहोत" असं देखील ममता यांनी म्हटलं आहे.
"शेतकरी आंदोलनात एकही राजकीय नेता नाही. शेतकरी स्वतःच लढा देत आहेत. ही नवी घटना आहे. आम्ही शेतकऱ्यांना बाहेरून पाठिंबा देत आहोत. माझे भाऊ, अमित शहा म्हणाले होते की, त्यांच्याकडे 52 लाख व्हॉट्सअॅप ग्रुप आहेत. त्यामुळे त्यातून ते शेतकऱ्यांची बदनामी करण्यासाठी ते काही पसरवू शकतात. सरकारनं माध्यमंही विकत घेतली आहेत" असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी "मी गळा कापून घेणं पसंत करेन पण भाजपासमोर झुकणार नाही" असं म्हणत ममता यांनी भाजपावर निशाणा साधला होता.
"मी गळा कापून घेणं पसंत करेन पण भाजपासमोर झुकणार नाही", ममता बॅनर्जी कडाडल्या
सोमवारी हुगळी येथे एका जनसभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं होतं. "पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर त्या लोकांनी माझा अपमान केला आहे. मी बंदुकीच्या गोळीवर विश्वास ठेवत नाही तर मी राजकारणावर विश्वास ठेवते. भाजपाने नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बंगालचा अपमान केला आहे. या कार्यक्रमात जर तुम्ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने घोषणा दिल्या असत्या तर मी तुम्हाला सलाम केला असता. पण तुम्ही जर मला बंदुकीच्या नळीसमोर ठेवण्याचा प्रयत्न करत असाल, तर अशावेळी प्रतिहल्ला कसा करायचा हे मला चांगलच माहीत आहे. त्या दिवशी त्यांनी बंगालचा अपमान केला आहे" असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं.