नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "देशातील संघराज्याचा ढाचा उद्ध्वस्त करण्यासाठी केंद्रातील सरकारने विविध सरकारी यंत्रणांचा उपयोग केला" असा आरोप ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी केला आहे. यासोबतच कोरोनाच्या काळात नागरिकांकडून गोळा केलेला 'पीएम केअर्स फंड'मधील पैसा कुठे गेला असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच केंद्रातील सरकारच्या इशाऱ्यावर राज्य सरकार चालणार नाही असं ही म्हटलं आहे.
"पीएम केअर्स फंडातील सर्व पैसे कुठे गेले? या मदतीचे भवितव्य काय आहे ते कोणाला माहिती आहे की नाही? कोट्यवधी रुपयांचा पैसा कुठे गेला, त्याचा हिशेब सादर का गेला नाही, केंद्र सरकार राज्य सरकारला सल्ले देतं मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने काय केलं याबाबत कोणीही बोलत नाही" असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. कॅबिनेट बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत त्यांनी असं म्हटलं आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भातही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेमध्ये पश्चिम बंगालमधील कायदा सुव्यवस्थेची स्थिती उत्तम असल्याचा दावाही ममता बॅनर्जी यांनी केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यापासून राज्यात फोडाफोडीच्या आणि पक्षांतराच्या राजकारणाला जोर आला आहे. गेल्या दहा वर्षांपासून राज्यात सत्तेवर असलेल्या ममत बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला फुटीचे ग्रहण लागले असून, काही बड्या नेत्यांसह अनेक आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. त्यातच आता ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारबाबतही अनेक दावे केले जात आहेत.
ममता सरकार अस्थिर झाल्याच्या चर्चा सुरू
काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी सरकारमधील बलाढ्य मंत्री शुभेंदू अधिकारी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासून ममता सरकार अस्थिर झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. शुभेंदू अधिकारी हे आता तृणमुल काँग्रेस सोडून भाजपामध्ये दाखल होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. हा ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेससाठी मोठा धक्का ठरू शकतो. शुभेंदू अधिकारी हे मिदनापूरमधील बलाढ्य नेते आहेत. तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये त्यांचा चांगला प्रभाव आहे.