कोलकाता - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. सध्या भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधून विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांत तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून भाजपामध्ये गेले आहेत. अशातच ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. नदिया जिल्ह्यातील शांतीपूरमधील तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) आमदार अरिंदम भट्टाचार्य यांनी बुधवारी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
भाजपचे सरचिटणीस आणि पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्यासह काही नेत्यांच्या उपस्थितीत अरिंदम यांना पक्षाचं सदस्यत्व देण्यात आलं आहे. भाजपा मुख्यालयात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून भट्टाचार्य यांचं स्वागत करण्यात आलं. "आज बंगालमधील तरूण बेरोजगारीच्या समस्येने त्रस्त झाले आहेत. तरुणांना आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र अद्याप त्यांना नोकरी देण्यात आलेली नाही. बंगालमध्ये ममता सरकारकडे कोणतंही व्हिजन नाही. तसेच भविष्यासाठी कोणतीही योजना नाही. भ्रष्टाचार वाढला आहे. त्यामुळेच आता मी आत्मनिर्भर बंगाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारधारेसोबत काम करणार आहे" असं अरिंदम भट्टाचार्य यांनी म्हटलं आहे.
भट्टाचार्य यांनी सर्वप्रथमच काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणुका जिंकली आणि नंतर तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. विधानसभा निवडणूकीपूर्वी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाला सतत झटके बसत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. याच दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यांना आता ममतांनी खडेबोल सुनावले आहेत. ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार निशाणा साधत टीका केली आहे. "भाजपा नक्षलवाद्यांपेक्षाही जास्त धोकादायक आहे" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. सापासोबत भाजपाची तुलना केला आहे. ज्यांची भाजपात जाण्याची इच्छा आहे ते जाऊ शकतात असं म्हमत त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याची इच्छा असणाऱ्यांना सुनावलं आहे. मंगळवारी पुरुलिया येथे एका रॅलीचं आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी ठणकावलं आहे.
"भाजपा नक्षलवाद्यांपेक्षाही जास्त धोकादायक; निवडणुकीआधी खोटी आश्वासनं देतील अन् संपली की पळून जातील"
"ज्यांना भाजपात जायचं आहे ते जाऊ शकतात, पण आम्ही त्यांच्यासमोर आपली मान झुकवणार नाही. राजकारण ही एक आदर्श विचारसरणी आहे, तत्वज्ञान आहे. आपण रोज कपडे बदलू शकतो, विचारसरणी नाही. तुम्ही सर्वांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाला मतदान केलंत. पण तुमचे खासदार भेटण्यासाठी आले का? त्यांनी तुम्हाला काही दिलं का? ते निवडणुकीच्या आधी तुम्हाला खोटी आश्वासनं देतील आणि निवडणूक संपली की पळून जातील" असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांत तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून भाजपामध्ये गेले आहेत. यावरूनही ममता बॅनर्जी यांनी रॅलीत भाजपावर हल्लाबोल केला. "विरोधकांना घाबरवण्यासाठी भाजपा आयटीचा वापर करत आहे. खोट्या बातम्या पसरवण्यासाठी ते व्हॉट्सअॅप ग्रुपचा वापर करत आहेत. भाजपा नक्षलवाद्यांपेक्षाही जास्त धोकादायक आहे" असं देखील ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.