कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला आता काही महिन्यांचाच अवधी राहिला असताना राज्यातील राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापू लागले आहे. त्यातच गेल्या काही काळापासून तृणंमूल काँग्रेसमध्ये नाराज असलेले ममता सरकारमधील मंत्री शुभेंदू अधिकारी यांनी काही दिवसांपूर्वी मंत्रीपदाचा आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. भाजपात जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, ममतांनी पहिला डॅमेज कंट्रोल केला आहे.
शुभेंदू अधिकारी हे गेल्या वर्षभरापासून ममता सरकारच्या कॅबिनेटच्या बैठकांना अनुपस्थित राहात होते. तसेच ते तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचा चर्चाही बंगालच्या राजकारणात रंगल्या होत्या. पश्चिम बंगालच्याराजकारणातील मोठे नाव असलेले शुभेंदू अधिकारी हे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये परिवहन मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत होते. काही दिवसांपूर्वीपासून ते भाजपात दाखल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आपल्या राजीनामापत्रात शुभेंदू अधिकारी म्हणाले की, मी माझ्याकडील मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. मी राज्यपालांनाही याबाबतची माहिती दिली आहे. तुम्ही मला राज्याची सेवा करण्याची संधी दिली. त्यासाठी मी तुमचा आभारी आहे.
आपल्या संघटनात्मक कौशल्यामुळे शुभेंदू अधिकारी हे तृणमूल काँग्रेसमध्ये पर्यायी नेतृत्व म्हणून समोर आले होते. दोन वेळा खासदार राहिलेले शुभेंदू हे नंदिग्राममधील आंदोलनामुळे चर्चेत आले होते. या आंदोलनाने बंगालच्या राजकारणाची दिशा बदलली होती. यामुळे त्यांचे पक्ष सोडून जाणे ममता बॅनर्जींना परवडणारे नव्हते. यामुळे ममत यांच्या तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते अभिषेक बॅनर्जी आणि प्रशांत किशोर यांनी मंगळवारी अधिकारी यांच्याशी चर्चा केली. उत्तर कोलकातामध्ये एका ठिकाणी ही बैठक दोन तास चालली. या बैठकीला सौगत रॉय आणि सुदीप बंदोपाध्याय देखील हजर होते.
तृणमूलने केलेल्या दाव्यानुसार अधिकारी यांची समजूत घालण्यात आली आहे. त्यांची नाराजी दूर करण्यात आली आहे. त्यांचे काही मुद्दे होते, ते समोरासमोर सोडविण्याची गरज होती. त्यामुळे ही बैठक घेण्यात आली. शुभेंदू हे पक्षाचे मोठे नेते आहेत आणि संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. नंदीग्राम आंदोलनानंतर २०११ मध्ये ममता बॅनर्जी यांनी प. बंगालची सत्ता हस्तगत केली होती.