पश्चिम बंगालमध्ये भाजपाविरोधात तृणमूल काँग्रेसच्या मुख्यमंत्री एकट्या पडल्याचे चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ममता यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. तसेच गरज पडली तर पवार बंगालला जाणार असल्याचेही एनसीपीच्या नेत्यांनी सांगितले होते. मात्र, आज काँग्रेसने प. बंगालची निवडणूक पुन्हा एकदा डाव्यांसोबत मिळून लढविणार असल्याची घोषणा केल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.
पुढील वर्षाच्या मध्यावर प. बंगालमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने आपली पूर्ण ताकद लावायला सुरुवात केल्याने बंगालमधील वातावरण तापलेले आहे. या राजकीय लढाईत ममता बॅनर्जी यांचे खंदे शिलेदारच भाजपाने फोडल्याने ममता यांच्यावर मोठे संकट उभे राहिले आहे. काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी टीएमसीविरोधात निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत.
काँग्रेसने पुन्हा टीएमसीविरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे. डाव्यांसोबत आघाडी करून निवडणुकीत उतरण्यावर काँग्रेसच्या हायकमांडने हिरवा झेंडा दाखविला आहे, असे चौधरी यांनी म्हटले आहे. चौधरी यांनी ट्विट केले आहे. यामुळे 2016 सारखी काँग्रेस पुन्हा टीएमसीविरोधात उभी ठाकणार आहे.
2016 चे चित्र काय होते? पश्चिम बंगालमध्ये एकूण 294 जागा आहेत. 2016 मध्ये काँग्रेसने डाव्यांसोबत आघाडी करत निवडणूक लढविली होती. तेव्हा काँग्रेस दुसरा मोठा पक्ष बनला होता. काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. तर सीपीएमला 26 आणि अन्य डाव्या पक्षांना काही जागा मिळाल्या होत्या. भाजपाला केवळ 3 जागा जिंकता आल्या होत्या. मात्र, आमदारांनी पक्षबदल केल्याने काँग्रेसचे आता 23 तर भाजपाकडे 16 आमदार आहेत.
प. बंगालमध्ये नवीन राजकीय समीकरणे ?, शरद पवारांची ममता बॅनर्जींशी चर्चापश्चिम बंगालमध्ये भाजपला रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याचे प्रयत्न सुरू झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यासाठी पुढाकार घेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी दूरध्वनीवरून सोमवारी चर्चा केली. प. बंगालमध्ये येत्या मे महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असून, भाजपने त्यासाठी जोरदार तयारी केली आहे. दुसरीकडे विरोधकांची एकजूट नसल्याने तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष, काँग्रेस, एमआयएम आदी पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या फाटाफुटीचा भाजपला फायदा मिळू नये, यासाठी सर्वांना एकत्र आणण्यासाठी शरद पवारांचे प्रयत्न असल्याचे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. त्यामुळे दोघांमध्ये झालेल्या चर्चेला महत्त्व प्राप्त झाले आहे.