कोलकाता : प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या उत्तम प्रशासक असून पंतप्रधानपदासाठी सुयोग्य आहेत असे मत कर्नाटकचे मुख्यमंत्री व जनता दल (एस)चे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभाराला जनता विटली आहे अशीही टीका त्यांनी केली. कुमारस्वामी यांच्या वक्तव्यामुळे पहिल्यांदाच पंतप्रधानपदासाठी ममता बॅनर्जी यांचे नाव पुढे आले आहे.ते म्हणाले की, पंतप्रधान कोण बनणार, हा विषय महत्त्वाचा नाही. लोकसभा निवडणुका कशा जिंकता येतील, यावर विरोधी पक्षांनी लक्ष केंद्रित करायला हवे. विविध राज्यांत निरनिराळी स्थिती आहे. देशात असे प्रभावी नेते आहेत जे विकासासाठी मोलाचे योगदान देतील. मागील सरकारे ज्या क्षेत्रांत फारशी प्रगती करू शकले नाहीत, तिथे ते नेत्रदीपक कामगिरी करून दाखवतील. मात्र एकदा निवडणुका होऊ जाऊ द्या. त्यानंतर विरोधी पक्षांनी बैठक घेऊन पंतप्रधानपदी कोणाला बसवायचे याचा निर्णय घेता येईल.भाजपाच्या मुकाबल्यासाठी झालेल्या महामेळाव्याला कुमारस्वामी व अनेक विरोधी नेते उपस्थित होते. कर्नाटकातील जनता दल (एस) व काँग्रेसचे सरकार उलथविण्याचे प्रयत्न भाजपाकडून होत आहेत. काँग्रेसचे चार आमदार भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे आपले आसन स्थिर राखण्याबरोबरच राष्ट्रीय राजकारणातही भूमिका बजावण्यावर कुमारस्वामींनी लक्ष केंद्रित केले आहे. (वृत्तसंस्था)>१९७७ सारखीच आता परिस्थितीकुमारस्वामी म्हणाले की, आणीबाणी लादणाऱ्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना १९७७ साली सर्व विरोधी पक्षांनी जसा एकमुखाने विरोध केला होता, तशीच काहीशी परिस्थिती आता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभाराविरोधात सारे विरोधी पक्ष एकवटले आहेत.
"पंतप्रधानपदासाठी ममता बॅनर्जी योग्य उमेदवार असल्याचा दावा"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 6:20 AM