कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील चित्रपटाच्या प्रदर्शनावरून झालेला वाद शमला नसतानाच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरील ‘बाघिनी' चित्रपटावरून नव्या वादंगाला तोंड फुटले आहे. हा चित्रपट ३ मेला प्रदर्शित करण्याचे घाटत आहे. या चित्रपटाविरोधात विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.बाघिनी हा ममता बॅनर्जी यांचा जीवनपट नसल्याचा दावा या चित्रपटाचे निर्माते पिंकी पॉल मोंडल व दिग्दर्शक नेहल दत्ता यांनी केला आहे. ममता बॅनजी यांनी वयाच्या सातव्या वर्षापासून संघर्ष केला आहे. पश्चिम बंगालवर ३४ वर्षे सत्ता गाजविणाऱ्या डाव्या पक्षांची राजवट आपल्या वादळी नेतृत्वाने ममता यांनी संपुष्टात आणली व या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या. अशा महिलेपासून प्रेरणा घेऊन बाघिनी चित्रपट बनविल्याचा दावा निर्माता व दिग्दर्शकाने केला आहे. लोकसभा निवडणुकांच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी डाव्यांनी कंबर कसली आहे. (वृत्तसंस्था)>रुमा चक्रवर्तींची भूमिकाबाघिनी चित्रपटातील महिला नेत्याचे नाव इंदिरा बंडोपाध्याय आहे. ती भूमिका रूमा चक्रवर्ती ही अभिनेत्री साकारत आहे. तृणमूल काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या जीवनावरील काही नाटकांमध्ये त्यांचे पात्र रूमा यांनी साकारले होते.
ममतांवरच्या ‘बाघिनी'विरुद्ध आयोगाकडे धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 4:05 AM