कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला आता काही महिन्यांचाच अवधी राहिला असताना राज्यातील राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापू लागलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केलेली असल्याने केंद्र विरोधात राज्य सरकारमध्ये दरी वाढू लागली आहे. यातच ममता बॅनर्जी यांच्या एका माजी मंत्र्याने विधानसभेत जाऊन आमदारकीचा राजीनामा दिला. तृणमूल काँग्रेसमध्ये नाराज असलेले ममता सरकारमधील मंत्री शुभेंदू अधिकारी यांनी काही दिवसांपूर्वी मंत्रीपदाचा आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. याच दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर भाजपाकडून पक्षात प्रवेश करण्याची सक्ती केली जात असल्याचा गंभीर आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. "तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडणारे संधीसाधू आहेत. पैशांच्या पिशव्यांचा वापर करून भाजपा तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे" असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. एका सभेला संबोधित करताना त्यांनी असं म्हटलं आहे. शुभेंदू अधिकारी हे गेल्या वर्षभरापासून ममता सरकारच्या कॅबिनेटच्या बैठकांना अनुपस्थित राहात होते. तसेच ते तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचा चर्चाही बंगालच्या राजकारणात रंगल्या होत्या.
"भाजपाकडे कोणतीही विचारसरणी नाही"
"तृणमूलचे प्रदेशाध्यक्ष सुव्रत बक्षी यांना भाजपाच्या नेत्यांनी पक्षात येण्याची गळ घातली यावरून भाजपाच्या नेत्यांच्या उद्धटपणाची कल्पना येते. भाजपाकडे कोणतीही विचारसरणी नाही, एकदोन संधीसाधू केवळ स्वत:च्या फायद्यासाठीच काम करीत आहेत" असं देखील ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालच्या राजकारणातील मोठे नाव असलेले शुभेंदू अधिकारी हे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये परिवहन मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत होते. काही दिवसांपूर्वीपासून ते भाजपात दाखल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आपल्या राजीनामापत्रात शुभेंदू अधिकारी म्हणाले की, मी माझ्याकडील मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. मी राज्यपालांनाही याबाबतची माहिती दिली आहे. तुम्ही मला राज्याची सेवा करण्याची संधी दिली. त्यासाठी मी तुमचा आभारी आहे.
"हिंमत असेल तर भाजपाने राष्ट्रगीत बदलून दाखवावं…"; ममता बॅनर्जींचं खुलं आव्हान
ममता बॅनर्जी यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला केला. राष्ट्रगीत बदलण्याच्या मागणीवरून त्यांनी हल्लाबोल केला आहे. "हिंमत असेल तर भाजपाने राष्ट्रगीत बदलून दाखवावं त्यांना योग्य उत्तर दिलं जाईल" असं खुलं आव्हान ममता बॅनर्जी यांनी दिलं आहे. ममता यांनी भाजपाला समुदायांमध्ये दंगे आणि द्वेष पसरवणारा नवा धर्म असं देखील एका सभेला संबोधित करताना म्हटलं आहे. राष्ट्रगीत बदलण्यासंदर्भात भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक पत्र लिहिलं होतं. यावरही ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "जर भाजपाने असं काही करण्याचा प्रयत्न केला तर राज्यातील जनता त्यांना योग्य ते उत्तर देईल. ते आपल्या देशाचा इतिहास बदलू इच्छित आहेत. आपलं राष्ट्रगीत बदलण्याच्या गोष्टी करत आहेत" असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.