कोलकाता - ममता बॅनर्जी यांच्या सरकारला आज जोरदार धक्के देण्यात आले आहेत. आजी माजी खासदारांसह 11 आमदारांनी तृणमूलला सोडचिठ्ठी देत शहांच्या उपस्थितीच भाजपात प्रवेश केला आहे. वर्षभरापासून ममता यांच्यावर नाराज असलेले शुभेंदू अधिकारी यांनी गेल्याच महिन्यात मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांनी विधानसभेत आमदारकीचाही राजीनामा दिल्याने ते भाजपात जाणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर आता नाराजांनी अधिकाऱ्यांसोबत भाजपात प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर जोरदार निशाणा साधला आहे.
"निवडणूक येईपर्यंत ममता दीदी तुम्ही एकट्याच राहाल" असं म्हणत अमित शहांनी हल्लाबोल केला आहे. तसेच जेव्हा पश्चिम बंगालमध्ये विधानसभेचे निकाल लागतील तेव्हा भाजपा 200 च्या बहुमताने सरकार स्थापन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यासोबतच "भारतीय जनता पक्षाला पाच वर्ष द्या. आम्ही बंगालला सोन्यासारखं बनवू" असं देखील म्हटलं आहे. पश्चिम बंगालची आर्थिक परिस्थिती खूप बिकट झाली आहे. जर राज्याला वाचवायचे असेल तर त्याची कडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपविण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले.
"आज सर्व पक्षांतील चांगले लोक भाजपात दाखल झाले आहेत. आज एक माजी खासदार आणि तृणमूल काँग्रेसमधील आमदार भाजपामध्ये आले आहेत. ही तर सुरुवात झाली आहे. निवडणूक येईपर्यंत ममता दीदी तुम्ही एकट्याच राहाल. जेव्हा विधानसभा निवडणुकीचे निकाल लागतील, तेव्हा 200 पेक्षा अधिक जागा जिंकून भाजपा सत्तेत आलेली असेल. ममता दीदी म्हणतात, भाजपा लोकांना करायला लावते. दीदींना मी आठवण करून देऊ इच्छितो की, जेव्हा तुम्ही काँग्रेस सोडून तृणमूल पक्ष बनवला, ते पक्षांतर नव्हते का?" अशा शब्दांत अमित शहांनी ममता बॅनर्जींना सणसणीत टोला लगावला आहे.
"ममतांना 10 वर्षे दिलीत; भाजपाला 5 वर्ष द्या, आम्ही बंगालला सोन्यासारखं बनवू"
"तुम्ही तीन दशकं काँग्रेसला दिली. 27 वर्षे कम्युनिस्टांना आणि ममता दीदींना 10 वर्षे दिलीत. भाजपाला पाच वर्ष द्या. आम्ही बंगालला सोन्यासारखं बनवू" असं देखील अमित शहांनी म्हटलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीबांसाठी जे अन्नधान्य पाठविलेले ते तृणमूल काँग्रेसने फस्त केले. भाजपाध्यक्षांच्या ताफ्यावर मोठमोठे दगड फेकले गेले, आम्ही यामुळे घाबरणारे नाही. पश्चिम बंगालच्या लोकांनी आता सत्तांतराचे मन बनविले आहे, असेही शहा म्हणाले आहेत.