मुंबई : भाजप नेते विनोद तावडे यांची राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल, रविवारी बोरीवलीत उत्तर मुंबई भाजपच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आपला सत्कार झाला नाही. राहिले असेल की विसरून गेले, हे माहिती नाही, असा सूर लावला.
तावडे यांच्या सत्कार प्रसंगी दरेकर मनातील सल लपवू शकले नाहीत. विशेषत: त्यांचा रोख उत्तर मुंबईचे भाजप अध्यक्ष गणेश खणकर यांच्यावर होता. ‘राजकारणात चढउतार येतच असतात. हा सापशिडीचा खेळ आहे. विनोद तावडे यांच्याकडून संयम ही एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. राष्ट्रीय सचिवपदी निवड झाल्याने उत्तर मुंबई भाजपकडून आज त्यांचा सत्कार करण्यात आला. मात्र, माझी विधानपरिषदच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर उत्तर मुंबईने माझा सत्कार केला नाही. विसरले की राहिले ते समजले नाही, अशा शब्दांत दरेकर यांनी खंत व्यक्त केली.
दरेकर यांचा सत्कार झाला नाही ही चूकच झाली, त्याची जबाबदारी मी स्वीकारतो आणि लवकरच त्यासाठी साजेसा कार्यक्रम घेण्याचे आश्वासन खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिले. शेट्टी यांच्या या प्रांजळपणावर उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. तावडे यांनी ‘दरेकर यांचा मंत्री म्हणून सत्कार करायचा होता, म्हणून विरोधी पक्षनेते पदाचा सत्कार झाला नसेल. कारण सध्याची राजकीय स्थिती तात्पुरती असल्याचे इथल्या पदाधिकाऱ्यांना पक्के माहिती आहे. त्यामुळे उत्तर मुंबईच्या अध्यक्षाची पॉवर अंडरइस्टिमेट करू नका, अशी मिश्कील टिपण्णी करतानाच तावडे यांनी एक प्रकारे इशारासुद्धा दिला. तावडे यांच्या संयमाचे कौतुक होत असतानाच, दरेकरांनी व्यक्त केलेल्या नाराजीबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.