मनोहर कुंभेजकरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई कॉंग्रेसच्या आगामी अध्यक्षांची नेमणूक लवकर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी म्हाडाचे माजी अध्यक्ष डॉ. अमरजीत मनहास व ज्येष्ठ कामगार नेते भाई जगताप यांच्यात चुरस आहे. माजी मंत्री सुरेश शेट्टी, माजी मंत्री नसीम खान, चरणजीत सप्रा यांचीही नावे चर्चेत आहेत. संघटनात्मकदृष्ट्या डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर ठेवून काम करून घेणारा, सर्वांना बरोबर नेणारा नेता म्हणून डॉ. अमरजीत मनहास यांच्या नावाला सर्वाधिक पसंती असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील यांनी मुंबई काँग्रेसच्या नवीन अध्यक्षांची नेमणूक आणि २०२२च्या पालिका निवडणुकीच्या तयारीबाबत दादरच्या टिळक भवन येथे पदाधिकाऱ्यांशी वैयक्तिक चर्चा केली. पाटील यांनी सह्याद्री अतिथीगृहात डॉ. मनहास आणि भाई जगताप यांना एकत्र बसवून चर्चा केली. या दोघांनी संघटनात्मक आणि राजकीय विषयांवर वैयक्तिक चर्चाही केली.
मनहास यांनी म्हाडाचे अध्यक्ष असताना १२००० मुंबईकरांना घर दिले होते. तर २००७च्या पालिका निवडणुकीत ७७ नगरसेवक निवडून आणले होते. त्यांना पक्ष संघटनेचा दांडगा अनुभव असून ते अध्यक्ष म्हणून अधिक यशस्वी ठरतील, असे मत सर्वाधिक जणांनी मांडल्याचे समजते.
पाटील दिल्लीला रवानाआज सकाळी विमानाने पाटील हे दिल्लीला गेले असून कालच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीचा सविस्तर अहवाल ते काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या समोर ठेवतील. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई काँग्रेसचे नवीन अध्यक्ष म्हणून डॉ. अमरजीत मनहास यांच्या नावाची औपचारिक घोषणा येत्या दोन-तीन दिवसांत दिल्लीहून केली जाईल.