नवी दिल्ली - जगातील सर्वात मोठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यास भारत सज्ज झाला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितलं आहे. कोरोनावरील लसी विकसित करणाऱ्या शास्रज्ञांचं मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी औषध महानियंत्रकांनी परवानगी दिल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी मोदींनी हे वक्तव्य केलं. याच दरम्यान कोरोना व्हायरस आणि लस यावरून काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. जोरदार हल्लाबोल करत टीकास्त्र सोडलं आहे.
काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी भाजपाने कोरोना महामारीचा राजकीय वापर केला असा गंभीर आरोप केला आहे. तसेच कोरोना लसीवरुन निर्माण झालेल्या वादावरुनही त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. कोरोनाची ही लस कोण घेईल? जिच्या विश्वसनीयतेवरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ज्या कंपनीने संशोधन आणि विकासात कोट्यवधी रुपयांची गुंतणवूक केली आहे. भाजपा सरकारने त्या कंपनीसाठी एक महान काम केलं आहे. आत्मनिर्भर भारताच्या नावाखाली सरकारने एका अशा कंपनीच्या कोरोना लसीला मंजुरी दिली आहे, ज्या लसीच्या चाचणीचा तिसरा टप्पाही पूर्ण झालेला नाही असं मनिष तिवारी यांनी म्हटलं आहे.
मनिष तिवारी यांच्याआधी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी कोरोना लसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. यामध्ये शशी थरूर, जयराम रमेश यांच्यासारख्या नेत्यांचाही समावेश आहे. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अद्याप पूर्ण झालेली नाही. अशावेळी या लसीच्या वापरासाठी मंजुरी देणं अत्यंत धोकादायक आहे असं ट्वीट शशी थरूर यांनी केलं आहे.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही भारत बायोटेकच्या कोरोना लसीबाबत सवाल उपस्थित केला आहे. भारत बायोटेक ही एक उत्तम गुणवत्ता असणारी आणि विश्वासार्ह कंपनी आहे. मात्र या कंपनीने तयार केलेल्या लसीच्या फेज-3 च्या ट्रायलसाठी प्रक्रियेच्या मूळ नियमांत बदल करण्यात येत आहेत. हे चकित करणारं आहे. आरोग्यमंत्र्यांनी यावर उत्तर द्यावं असं जयराम रमेश यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"गरिबांना कोरोना लस कधी मिळणार, ती मोफत असणार की नाही?", अखिलेश यादवांचा भाजपाला सवाल
समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी कोरोनाच्या लसीबाबत अजब आणि धक्कादायक विधान केलं आहे. माझा भाजपावर विश्वास नाही. त्यामुळे मी भाजपाच्या सरकारकडून देण्यात येणारी कोरोनावरील लस घेणार नाही, असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे. यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी कोरोना लसीबाबत भाष्य केलं आहे. कोरोनावरील लस कधी येणार, मोफत असणार की नाही? असा सवाल विचारला आहे. "मी किंवा समाजवादी पक्षाने कधीही तज्ज्ञ, संशोधक किंवा शास्त्रज्ञांविषयी प्रश्न उपस्थित केला नाही. जर संशय किंवा काही शंका असतील तर स्पष्टीकरण देण्याची जबाबदारी सरकारची आहे" असं अखिलेश यांनी म्हटलं आहे. तसेच आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की गरिबांना लस कधी मिळेल? मी भाजपाला विचारू इच्छितो की गरिबांना लस देण्यास त्यांना किती वेळ लागेल आणि ती विनामूल्य असेल की नाही?" असा सवाल देखील अखिलेश यादव यांनी विचारला आहे.