Bhaskar Jadhav Speech: आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात ओबीसी, मराठा, धनगर, आदिवासी असा संघर्ष होताना दिसत आहे. आरक्षणाच्या प्रश्नावरून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार भास्कर जाधव यांनी सरकारवर टीकेचे बाण डागले. भास्कर जाधवांनीछगन भुजबळ यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर नरहरी झिरवळ यांच्यासह मंत्रालयातील जाळीवर उड्या मारणाऱ्या आमदारांचाही उल्लेख केला.
"हे विश्वासघातकी सरकार"
भास्कर जाधव म्हणाले, "राज्यातील सरकार विश्वासघातकी सरकार आहे. जे विश्वासघाताने आलेले आहेत, ते सगळ्यांचा विश्वासघातच करणार, हे महाराष्ट्राने लक्षात घेतलं पाहिजे. काय झालं मराठ्यांच्या आरक्षणाचं? एकनाथ शिंदेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला स्पर्श केला आणि सांगितलं की, आम्ही कोर्टात टिकणार आरक्षण मराठ्यांना देणार आहोत."
मनोज जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं
"मला वाटतं दोन दिवसामध्ये निवडणूक जाहीर होईल, हे आरक्षण जाहीर कधी करणार? कोर्टात ते न्यायाच्या कसोटीला कधी उतरणार, हे पण आपण लक्षात घ्या. मी धन्यवाद देतो मनोज जरांगे पाटलांना, त्यांनी वेळीच यांना ओळखलं आणि त्यांनी आपलं उपोषण सोडलं", असे भास्कर जाधव म्हणाले.
"कुठेय छगन भुजबळ? आहेत कुठे? परवाच्या दिवशी ओबीसींमध्ये आठ-दहा जातींचा उपवर्गीय म्हणून समावेश केला. याचा अर्थ ओबीसींचं आरक्षण आम्ही जाऊ देणार नाही सांगितलं. कधी होऊ देणार नाही, असं सांगितलं, पण त्यामध्ये आठ-दहा जाती घालून जातींमध्ये लढे उभे करण्याचा प्रयत्न केला", असा आरोप भास्कर जाधव यांनी केला.
'झिरवळ आणि आमदारांनी आत्महत्या करण्यासाठी उड्या मारल्या'
"चार दिवसांपूर्वी काय झालं? सत्ताधारी पक्षाचे आमदार, त्यामध्ये विधान मंडळाचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे आत्महत्या करण्याकरीता म्हणून मंत्रालयाच्या चौथ्या पाचव्या मजल्यावरून उड्या टाकतात, याचा अर्थ या सरकारवर कुणाचाही विश्वास राहिलेला नाही. कारण हे सरकार विश्वासघातकी आहे", असा हल्ला भास्कर जाधवांनी केला.