Manoj Jarange Patil Vidhan Sabha Election 2024: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नारायण गडावर दसरा मेळावा घेतला. या मेळाव्यातून त्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीचा पुनर्रुच्चार केला. त्याचबरोबर वेळ आली, तर निवडणुकी उभेही राहू, असेही ते म्हणाले. मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणूक लढवण्याबद्दल काय भूमिका मांडली वाचा...
मनोज जरांगे दसरा मेळाव्याला उपस्थितांशी संवाद साधत होते. त्याचवेळी खालून लोकांनी समोरच्या बाजूला उभ्या असलेल्यांना खाली बसवण्यासाठी आवाज दिला. त्यावर मनोज जरांगे म्हणाले, "तुम्हाला आवाज तर येत असेल, ना... आवाज येतोय तर उभ्या राहिलेल्यांना राहू द्या. उभं राहायचे त्यांचे दिवसही जवळच आलेत."
Manoj Jarange Patil: 'काहीही करायची वेळ येऊ शकते'
या वाक्यानंतर उपस्थितांनी जल्लोष केला. त्यावर मनोज जरांगे म्हणाले, "मी उभा नाही म्हणालो मी. लयच पटकन खुश होतात. काहीही करायची वेळ येऊ शकते, तसं काही नाही. मी तुम्हाला काय सांगितलंय, कलंक लागू द्यायचा नाही."
"वेळेवर काही ठरवलं तरी त्याच भूमिकेत चालायचं. पण, शांत, शक्ती आणि बळ हे मात्र, समाजाचंच वाढवायचं. स्वतःचं वाढवायचं नाही. होऊद्या काय व्हायचं ते", असे मनोज जरांगे म्हणाले.
या मेळाव्यात बोलताना मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असे स्पष्ट म्हटले नाही. पण, 'काहीही करायची वेळ येऊ शकते; तसं काही नाही', अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यामुळे आगामी विधानसभेला जरांगे पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरू शकतात, या चर्चेला पुन्हा सुरूवात झाली आहे.