मुंबई – राज्यातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय अलीकडेच महाविकास आघाडी सरकारने घेतला होता, यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंना मिळणारी झेड दर्जाची सुरक्षा काढून या नेत्यांना आता वायप्लस एक्स्कॉर्ट दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राजकीय नेत्यांच्या सुरक्षेबाबत आढावा घेणाऱ्या बैठकीत अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयावरून विरोधी पक्षाने सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीकेचं लक्ष्य केले होते. यातच राज ठाकरेंची सुरक्षा कमी केल्यावरून मनसे नेत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. राज ठाकरेंना दहशतवाद्यांचा धोका पाहता त्यांची सुरक्षा वाढवण्याऐवजी कमी करणं हे खुजेपणाचं लक्षण आहे अशी टीका मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ठाकरे सरकारवर केली होती, तर मनसेचे कार्यकर्तेच राज ठाकरेंचे खरं संरक्षण आहेत असं रुपाली पाटील यांनी सांगितले होते.
याचदरम्यान मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी पुन्हा सरसावले आहेत, मागील सरकारच्या काळात राज ठाकरेंची सुरक्षा कमी केल्यानंतर मनसैनिकांना दिवसरात्र राज ठाकरेंना संरक्षण दिलं होतं, त्यावेळी प्रत्येक विभागातील पदाधिकारी टप्प्याटप्प्याने राज ठाकरेंच्या कृष्णकुंज निवासस्थानी संरक्षण देण्यासाठी हजर राहत होते, त्याचप्रमाणे आताही मनसेचे सरचिटणीस नयन कदम यांनी राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी मनसेच्या महाराष्ट्र रक्षक पथकाची स्थापना केली आहे.
महाराष्ट्र रक्षक नावाने टी-शर्ट छापून मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरे यांना संरक्षण देणार आहेत, बोरिवली-कांदिवली परिसरातील हे कार्यकर्ते राज ठाकरेंच्या कृष्णकुंज निवासस्थानाबाहेर तैनात होते, सरकारच्या निर्णयाचा सरचिटणीस नयन कदम यांनी जोरदार विरोध करत आम्ही महाराष्ट्र सैनिक राजसाहेबांच्या सुरक्षेसाठी सदैव जागरूक आहोत असं सांगितले आहे.
काय म्हणाले होते बाळा नांदगावकर?
राज्य सरकारने विरोधी पक्षातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली. त्यात राज ठाकरेंचेही नाव आले. सरकार कोणाचेही असो वास्तवाचे भान ठेवून असे निर्णय घ्यायला हवेत. राज ठाकरेंच्या रोखठोक स्वभावामुळे अनेक हितशत्रू साहेबांबद्दल वैर बाळगून आहेत, परंतु साहेबांनी कधी अशा हितशत्रूंची तमा बाळगली नाही. साहेबांच्या एका आवाजावर अनेक सामान्य लोकांना संरक्षण देणारे हजारो महाराष्ट्र सैनिक या राज्यात आहेत. राज ठाकरेंच्या जीवाला आपल्या देशातील विघ्नसंतोषी लोकांपासून तसेच पाकिस्तानी दहशतवाद्यांपर्यंत धोका असल्याचे आपण जाणूनच आहोत. तरी त्यांची सुरक्षा वाढविण्याऐवजी कमी करण्याचा घेतलेला निर्णय हा सरकारचे "खुजेपण" ठळकपणे दाखविणारा आहे. चीड या गोष्टीची येते की यात ज्यांना नव्याने सुरक्षा देण्याचा अथवा ज्यांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे या यादीतील काही नावे बघितल्यास एकच प्रश्न उपस्थित होतो ते म्हणजे सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा सवाल मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केला होता.