मुंबई - स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री या नात्याने पोलीस दलाचे नेतृत्व केले आहे. पाच वर्षे याच पोलिसांनी त्यांना साथ दिली. प्रशासन चालविण्यात, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मदत केली. मुंबई पोलिसांचे 'थोबाड काळे झाले' अशाप्रकारची भाषा कसे वापरू शकतात? असा संतप्त सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.(Home Minister Anil Deshmukh Target Devendra Fadnavis over Mansukh Hiren Death Controversy)
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले होते, त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हटलंय की, महाराष्ट्र पोलीस दलाचे संपूर्ण जगात नाव आहे. यामागे आम्हा कोणा राजकारण्यांचे नव्हे तर पोलिसांचेच कर्तृत्व आहे. महाराष्ट्र पोलिस दलाला उज्वल परंपरा आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रावर एवढा राग का काढत आहेत हेच समजत नाही असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला.
तसेच देवेंद्र फडणवीस एवढा राग का काढत आहेत याबाबतच्या राजकारणात जाऊ इच्छित नाही. परंतु, त्यांचे आरोप हे संपूर्ण महाराष्ट्राची बदनामी करणारे आहेत. महाराष्ट्र पोलीस दलाला उज्वल परंपरा आहे म्हणून सामान्य माणसाचा कायदा आणि सुव्यवस्थेवर विश्वास टिकून आहे. क्षुद्र राजकारणासाठी आपण या पध्दतीचे आरोप करून सामान्य जनतेचा विश्वास डळमळीत करू नका असं आवाहनही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणावरून विधानसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नीच्या तक्रार अर्जाचा हवाला देत पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले. मनसुख हिरेन यांच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार मनसुख हिरेन यांचा खून झाला असावा, तसेच तो सचिन वाझे यांनी केला असावा. हिरेन यांना सचिन वाझे आधीपासून ओळखत होते. तसेच हिरेन यांची कार चार महिन्यांपासून सचिन वाझेंकडे होती,असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला