मुंबई - नुकत्याचा आटोपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या एकत्रित बेरजेसमोर भाजपाची आकडेवारी फारच किरकोळ ठरली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून पक्षाला लागलेली गळती ही भाजपासाठी चिंतेची बाब ठरलेली आहे. आता भाजपाची चिंता वाढवणारा अजून एक दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.राज्यातील भाजपाचे अनेक बडे नेते हे राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा दावा राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे. अनिल देशमुख यांनी केलेल्या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता असून, त्याचे हादरे भाजपाला बसणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच राष्ट्रवादीच्या संपर्कात असलेल्या भाजपाचे बडे नेते कोण याचीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.दरम्यान, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता विविध पक्षाचे नेते पुन्हा घरवापसी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हे नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेत आहेत, त्यामुळे आगामी काळात मीरा-भाईंदरमध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर पुन्हा वाजणार असल्याचं दिसत आहे.मीरा-भाईंदरच्या माजी महापौर, माजी विरोधी पक्षनेते यांच्यासह शेकडो नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. काही कारणास्तव या नेत्यांनी राष्ट्रवादीला रामराम करून इतर पक्षात प्रवेश घेतला होता, परंतु आता पुन्हा त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याचं ठरवलं आहे. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मीरा-भाईंदरमधील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला होता.