अहमदनगर – काही दिवसांपूर्वीच भाजपाला सोडचिठ्ठी देत उत्तर महाराष्ट्रातील मोठे नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हातात बांधलं, एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे भाजपाला धक्का बसला त्याचसोबत खडसेंनी भाजपामधील नाराजांना मोकळी वाट करून दिली. जळगाव जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपातून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणं पसंत केले.
त्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्यातही भाजपाला नाराजीचा फटका बसत आहे. श्रीरामपूर येथील भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्यावर पक्ष संपवण्याचा आरोप करत भाजपाच्या २३१ पैकी २१३ बूथ प्रमुखांनी शनिवारी राजीनामा दिला. अनेकांना जिल्हा आणि तालुका कार्यकारणीत डावलल्याचा आरोप करण्यात आला त्यामुळे श्रीरामपूर येथे भाजपाला खिंडार पडलं. नगरसेवक आणि माजी शहराध्यक्ष किरण लुणिया आणि अभिजीत कुलकर्णी यांनी नाराजांचा मेळावा घेत राजेंद्र गोंदकर यांच्यावर निशाणा साधला.
नगर जिल्ह्यातील या राजकीय घडामोडीवर राष्ट्रवादीचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाष्य केले आहे. याबाबत त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडीचं सरकार आमचं ५ वर्ष पूर्ण करणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाही, ५ वर्ष व्यवस्थित पूर्ण होणार असून त्यापुढीलही ५ वर्ष आमचं सरकार असणार आहे. त्यामुळे नजीकच्या काळात नगर जिल्ह्यातील भाजपाचे अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
श्रीरामपूर येथे भाजपाला २०१४ च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती, भाऊसाहेब वाकचौरे ४६ हजार मतांनी दुसऱ्या क्रमांकावर राहिले. असे असताना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी तीस वर्ष संघर्ष करून श्रीरामपुरात पक्ष वाढविला. ज्यांच्यावर विविध आंदोलनात अनेक गुन्हे दाखल झाले, त्याच लोकांना कार्यकारणीतून वगळले. ज्यांचा समावेश केला त्यांच्याबरोबर मात्र पक्षाचे कोणतेही बूथ प्रमुख अथवा कार्यकर्ते नाहीत. त्यांच्याकडे जनाधार नाही त्यांना पदे दिली गेली. मात्र केवळ निष्ठावंतांना संपवण्यासाठी राजकारण केले, असा गंभीर ठपका राजेंद्र गोंदकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. नाराज गटाने श्रीरामपूर संचलन समिती स्थापन केली असून त्या माध्यमातून पुढील काळात कामकाज करणार आहेत.
अप्रत्यक्षरीत्या माजी मंत्री राम शिंदे यांच्यावरही खापर फोडण्यात आले आहे. उत्तरेत श्रीरामपूरमध्ये भाजपाचे मोठे संघटन आहे. श्रीरामपुरातील कार्यकारिणी निवडीचा वाद थेट प्रदेशस्तरावर पोहोचला होता. जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणी घोषित झाल्या. मात्र तरीही श्रीरामपूरच्या निवडी मात्र होऊ शकल्या नव्हत्या. मात्र जिल्ह्यातील या राजकारणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला बळ मिळणार असल्याची चर्चा आहे.