मीरा-भाईंदर – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता विविध पक्षाचे नेते पुन्हा घरवापसी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हे नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेत आहेत, त्यामुळे आगामी काळात मीरा-भाईंदरमध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर पुन्हा वाजणार असल्याचं दिसत आहे.
मीरा-भाईंदरच्या माजी महापौर, माजी विरोधी पक्षनेते यांच्यासह शेकडो नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. काही कारणास्तव या नेत्यांनी राष्ट्रवादीला रामराम करून इतर पक्षात प्रवेश घेतला होता, परंतु आता पुन्हा त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याचं ठरवलं आहे. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मीरा-भाईंदरमधील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे.
यात मीरा-भाईंदर महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते डॉ. असिफ शेख, माजी महापौर निर्मला सावळे आणि रमजान खत्री यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला आहे. गेल्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अनेकांनी राष्ट्रवादी सोडून अन्य पक्षात प्रवेश करत पक्षाला धक्का दिला होता. काही जण भाजपात, शिवसेनेत आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आता हे सगळेच नेते पुन्हा राष्ट्रवादीत आले आहेत.
शिवसेनेच्या मेनेंजीस सातन यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे मेनेंजीस सातन यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसचा हात हाती धरला होता. काशीमिरा हायवे येथे शिवसेनेचे मेनेंजीस सातन यांचा दबदबा होता, महाराष्ट्र काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांच्या उपस्थितीत सातन यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला होता. मीरारोडच्या काँग्रेस पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदावरून भाजपा आणि शिवसेनेचं बिनसलं, त्यानंतर एकमेकांचे कट्टर विरोधक राहिलेले काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने हातमिळवणी करत राज्यात महाविकास आघाडी स्थापन करून सत्ता मिळवली, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येण्यापूर्वी शिवसेना-काँग्रेसमधील नेते एकमेकांच्या पक्षात प्रवेश करत होते, परंतु राज्यात सत्तेत एकत्र असताना या पक्षांतराकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.