मुंबई : मराठा समाजाचे आरक्षण व इतर प्रश्नांसंदर्भात राज्यसभेचे सदस्य संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची येथे भेट घेऊन चर्चा केली. शुक्रवारी ते भूमिका जाहीर करणार आहेत.संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले की मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने कसा पुढाकार घेतला पाहिजे या संदर्भात मी आजच्या भेटीत पवार यांच्याशी चर्चा केली. त्या व्यतिरिक्त राज्य शासनाने मराठा समाजाच्या कल्याणासाठी कुठल्या योजना लागू केल्या पाहिजेत या संदर्भात मी काही सूचना केल्या. ज्यांना नियुक्तिपत्रे दिलेली आहेत आणि ज्यांची निवड झालेली होती अशा सर्व मराठा उमेदवारांना तातडीने शासकीय नोकऱ्यांमध्ये सामावून घेतले पाहिजे, अशी भूमिकाही मी मांडली. पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. राज ठाकरे यांनीही प्रश्न समजून घेतला.
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात फिरलो. लोकभावना जाणून घेतल्या. आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजात अस्वस्थता आहे. आरक्षणासाठीचा न्यायालयीन लढा सुरूच राहील. आंदोलनाबाबत काय ते मी उद्या बोलेन. मात्र, मराठा समाजाला सवलती देण्याची भूमिका शासनाने तातडीने घेतली पाहिजे.- खासदार संभाजीराजे छत्रपती