मुंबई – मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर राज्यभरात मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून मराठा आरक्षण संघर्ष समितीने येत्या १० ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. मात्र या बंदला पाठिंबा नसल्याचं खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र बंद करून काही फायदा होईल का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, माझा महाराष्ट्र बंदला पाठिंबा नाही, कोरोनाचा संसर्ग आहे. त्यामुळे बंद नकोच, बंद पुकारणारे मराठा समाजातील नेते नाहीत. त्यांच्या बंदला मराठा समाजातून पाठिंबा नाही, महाराष्ट्र बंद करुन काही फायदा होईल का? मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल हा निकाल असतो, तो मान्य करावा लागतो. स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाज दुखी आहे असं त्यांनी म्हटलं आहे. टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे सांगितले.
तसेच सुप्रीम कोर्टाकडून मराठा आरक्षणावरील स्थगिती उठत नाही तोवर समाजाला ईडब्ल्यूएसचं १० टक्के आरक्षण घ्यावं असं मंत्री अशोक चव्हाणांनी मला फोन करुन सांगितले. परंतु यास आम्ही नकार दिला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली. EWS आरक्षण एका जातीसाठी नाही, ते सर्व खुल्या प्रवर्गासाठी आहे. जर हे आरक्षण घेतले तर सुप्रीम कोर्टात मराठा समाजाचा कोणताही दावा राहणार नाही म्हणून मी त्यांना EWS आरक्षण घेणं धोक्याचं असल्याचं सांगितलं अशी माहिती खासदार संभाजीराजेंनी दिली.
काय म्हणाले होते सुरेश पाटील?
EWS चा मराठा समाजाला फायदा करुन घेतला पाहिजे असा ठराव गोलमेज परिषदेत पास करुन घेतला आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणावरील स्थगिती कोर्टाकडून उठत नाही, तोपर्यंत फायदा मिळाला पाहिजे अशी मागणी मराठा आरक्षण संघर्ष समितीचे सुरेश पाटील यांनी केली होती. छत्रपती संभाजीराजेंनी काही संघटनांचे ऐकून EWS आम्हाला नको अशी भूमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडली, ती भूमिका चुकीची आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार शिक्षणात कोणत्याही समाजाला आरक्षण देता येणार नाही असा निर्णय आहे. आज मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती असल्याने समाज आरक्षणापासून वंचित आहे. मराठा समाजासमोरील ताट काढून घेतलं आहे त्यामुळे समाजात असंतोष पसरला आहे. येत्या १० ऑक्टोबर रोजी मराठा गोलमेज परिषदेने महाराष्ट्र बंदची हाक दिली असल्याचं त्यांनी सांगितले होते.
दोन्ही राजेंनी मराठा समाजाचं नेतृत्व करू नये
संभाजी महाराज हे राजे आहेत, ते शाहू महाराजांचे वंशज आहे. मुख्यमंत्र्यासोबत बैठकीला जाण्यापूर्वी त्यांनी सगळ्या संघटना एकत्र बोलावून त्यांची मते जाणून घ्यायला हवी होती, परंतु काही संघटनांचे ऐकून गैरसमज झाल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत ते मत मांडले आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती उदयनराजे यांनी मराठा समाजाचे नेतृत्व करू नये असं सामान्य मराठा म्हणून मला वाटतं, मराठा आरक्षणात भाग घेतात तिथपर्यंत ठीक आहे, जर मराठा समाजाचं नेतृत्व एखाद्या राजाकडे गेले, तर धनगर समाज, ओबीसी, भटकेविमुक्त, इतर समाज आले तर त्यांचेही नेतृत्व त्यांना करावं लागेल, प्रत्येक संघटना आपपल्या समाजाचे प्रश्न मांडत असतात, राजांनी कोणत्याही एका समाजाचे नेतृत्व न करता सर्व समाजाचे नेतृत्व राजे म्हणून ते करतायेत, त्यामुळे त्यांची भूमिका योग्य आहे, आमच्या कार्यकर्त्यांची भूमिका आम्ही पार पाडत आहोत असंही सुरेश पाटील यांनी सांगितलं होतं.