सातारा – मागील अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने बुधवारी अंतिम निकाल सुनावला. या निकालात मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण घटनाबाह्य असून ते रद्दबातल करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. या निर्णयामुळे राज्यातील मराठा समाजात मोठी संतापाची लाट पसरली आहे. त्याचे पडसाद आता हळूहळू उमटू लागले आहेत.
साताऱ्यात मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात काही अज्ञातांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस कार्यालयावर दगडफेक केली आहे. इतकंच नाही तर गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनाही याचा फटका बसला आहे. शंभुराज देसाई यांच्या साताऱ्याच्या निवासस्थानाबाहेर कोणीतही शेणाच्या गोवऱ्या फेकल्या असून पोलीस याचा तपास करत आहेत. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर या घटनेनं साताऱ्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीसह काँग्रेस सातारा जिल्हा कार्यालयावर अज्ञातांनी गुरुवारी सकाळच्या वेळेत दगडफेक केली. यावेळी सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील निवासस्थाने देखील अज्ञातांनी शेण फेकले. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलिस फोर्स दाखल झाले. सुप्रीम कोर्टाने बुधवारी मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवरच गुरुवारी राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक झाल्याचे समजते.
दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अतिरिक्त जिल्हा अधिक्षक पोलीस अधीक्षक धीरज पाटील पोलीस फौज घेऊन राष्ट्रवादी कार्यालयात दाखल झाले. कार्यालयाला सुरक्षा देण्यात आली. मंत्री देसाई यांच्या निवासस्थानाबाहेर देखील कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. दगडफेक तसेच शेण फेक करणाऱ्यांची धरपकड करण्यासाठी पोलिसांनी धावाधाव सुरू केलेली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्वासन
कोरोनाच्या धोक्याच्या वळणावर आपण उभे आहोत, तोच संयम तीच शांतता गरजेची आहे. निराश झाला तर तो महाराष्ट्र कसला? काही समाजविघातक शक्ती आग लावण्याचा प्रयत्न करतील पण त्यांच्या भडकविण्याला भीक घालू नका. सरकार मराठा समाजासाठी पूर्ण ताकदीने लढून लढाई जिंकल्याशिवाय आणि तुम्हाला हक्क, न्याय मिळवून देण्याशिवाय राहणार नाही, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(CM Uddhav Thackeray) केले आहे.