सातारा - सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत घेतलेला निर्णय हा दुर्दैवी घटना आहे. परंतु, या पाठीमागे मोठे षडयंत्र सामान्य माणसाला दिसून येत आहे. त्यामुळे साताऱ्यात राष्ट्रवादी कार्यालयावर ज्यांनी सूडबुद्धीने दगडफेक केली. तो कोणत्या पक्षाशी व 'संघा'शी संलग्न आहेत, याची सखोल चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे.(MLA Shashikant Shinde Target BJP Over Broken up NCP Office in Satara by unidentified people)
याबाबत शशिकांत शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवराय यांच्या राजधानीत सच्च्या मावळा असे कृत्य कधी ही करणार नाही. त्यामुळे दगडफेक करणाऱ्या आरोपींचे कोणाकोणाशी संबंध आले? हा कट कुठे शिजला? याची पाळेमुळे पोलीस यंत्रणेने शोधली पाहिजेत. अशा हल्ला मराठा समाज व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भीक घालत नाही. म्हणून पोलीस यंत्रणेला अगोदर आम्ही जाब विचारण्यासाठी पोहचलो आहे. आपल्याला खूप मोठी शाबासकी मिळेल या भ्रमात संबंधितांनी राहू नये. आम्ही जशास तसे उत्तम प्रकारे उत्तर देऊ शकतो असा ही मार्मिक इशारा त्यांनी दिला आहे.
मराठा आंदोलन चिघळलं; साताऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं कार्यालय फोडलं, अन्...
तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे सांगितले होते की, सर्वोच्च न्यायालय जो निर्णय घेतील, त्याबाबत राज्य सरकारला श्रेय किंवा दोष देता येणार नाही. असा आशय मांडला होता. सध्या आरक्षण निकालाने त्याची भूमिका ही मराठा समाजामध्ये आग लावण्याचा प्रयत्न करणारी प्रथमदर्शनी दिसून येत आहे. बहुजन व मराठा समाजाबद्दल आकस असल्याने त्यांनी अनेक मराठा समाजातील नेतृत्व आपल्या बाजूला ओढून घेतले आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे माजी मुख्यमंत्री उभे राहिले. अनेकांच्या राजकीय महत्वकांक्षा कमी करण्यासाठी कधी इडी, सी.बी. आय, गुतचर विभाग, फोन टापिंग चे प्रकार मागे लावले, तरी तेवढी ताकद मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारकडे लावली नाही,३७० कलम रद्द करणे, तलाक पद्धत रद्द करणे, नोटबंदी, लॉकडाऊनचे निर्णय पटकन घेतले जातात मग मराठा आरक्षण निर्णय सुध्दा ते घेऊ शकत होते. पण, त्यांनी ते केले नाही, ते झाले असते तर केंद्राने केले असे सांगून नेहमीप्रमाणे दिशाभूल केली असती असा ही आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी केला. दरम्यान, मोडेन पण वाकणार नाही, ही जात मराठ्यांची आहे, सर्व पुरोगामी विचारांचे समाज बांधव व इतर समाज यांच्या सहकार्याने एक ना एक दिवस मराठा समाजाला आरक्षण मिळवून दाखवू असा ही आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.