मुंबई – मराठा समाजासाठी दिलेल्या शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे. या निर्णयावर सर्वच स्तरातून विविध प्रतिक्रिया उमटत असून विरोधकांनी सत्ताधारी महाविकास आघाडीला टार्गेट केलं आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तुमच्या आदित्य किंवा तेजसचे कोणी अधिकार हिसकावून घेतले असते तर..अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.(BJP MLA Nitesh Rane Target CM Uddhav Thackeray over Maratha Reservation Supreme court verdict)
आमदार नितेश राणेंनी ट्विट करत म्हटलंय की, मुख्यमंत्री साहेब, तुमच्या आदित्य किंवा तेजसचे कोणी अधिकार हिसकावून घेतले असते. त्यांचे भविष्य कोणी अंधारात टाकले असते तर मग मराठा आरक्षण नक्कीच टिकवले असते असं त्यांनी म्हटलं आहे.
त्याचसोबत या महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण चा नियोजित पद्धतीने खून केला आहे. सरकार आल्यापासून ही ठरवून केलेली हत्या आहे. कसली तयारी नाही. फक्त नाटक आणि ढोंगीपणा. शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे शिकवून ठेवले आहे. तोंड वाजवून न्याय भेटत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा असा इशाराही नितेश राणेंनी सरकारला दिला आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर मुख्यमंत्री काय म्हणाले?
महाराष्ट्र कोरोना विरुद्धची शर्थीची लढाई लढत असताना सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय फेटाळण्याचा निकाल दिला, हे महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी व लढवय्या समाजाचे दुर्देवच म्हणायला हवे. महाराष्ट्राने मराठा समाजाचा स्वाभिमान जपण्यासाठीच आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. राज्याच्या विधी मंडळात सर्वच राजकीय पक्षांनी एकमुखाने घेतलेल्या या निर्णयावर आता सर्वोच्च न्यायालयाने वरवंटा फिरवला. काय तर म्हणे, महाराष्ट्र सरकारला या आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लगावला.
त्याचसोबत आता मराठा आरक्षणाबाबतचा तातडीचा निर्णय पंतप्रधान व राष्ट्रपतींनीच घ्यावा ही आमची त्यांना हात जोडून विनंती आहे. त्याआाधी शहाबानो प्रकरण, ॲट्रोसिटी कायद्यासंदर्भात तसेच ३७० कलम काढण्यासंदर्भात, केंद्राने तत्पर निर्णय घेवून न्यायप्रियता दाखवली आहेच. यासाठी घटनेतही बदल केले आहेत. आता तीच गती मराठा आरक्षणाबाबत दाखवावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.