उस्मानाबाद – मराठा आरक्षणावरून कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे राज्यभर दौरा करत आहेत. संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभारलं जात आहे. परंतु भाजपात राहून खासदारकी ठेवायची आणि आंदोलन करायचं ही दुटप्पी भूमिका घेणे योग्य नाही. छत्रपती संभाजीराजेंनी भाजपाच्या खासदारकीला लाथ मारायला हवी असं मत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केले आहे. उस्मानाबादमध्ये ते बोलत होते.
माजी आमदार हर्षवर्धन जाधव म्हणाले की, खासदारकी-आमदारकीपेक्षा महाराजांची गादी श्रेष्ठ आहे. छत्रपती संभाजीराजेंनी सर्वप्रथम खासदारकीचा राजीनामा द्यायला हवा. आंदोलनाचं नेतृत्व करताना खासदारकी ठेवायची आणि आंदोलन करायचं ही दुटप्पी भूमिका घेणे योग्य नाही. येत्या ९ ऑगस्ट क्रांती दिनी दिल्लीत धरणं आंदोलन करणार असून संभाजीराजेंनी या आंदोलनात सहभागी व्हावे असं आवाहन त्यांनी केले आहे. त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांच्या भूमिकेवर छत्रपती संभाजीराजे काय मत मांडतात हे पाहणं गरजेचे आहे.
छत्रपती संभाजीराजे आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवू, पण...
बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीराजेंना प्रश्न विचारला होता. मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा अशी मागणी आपण का करत नाही? त्यावर संभाजीराजे म्हणाले होते की, प्रश्न विचारायचे असतील तर मला मुख्यमंत्री करा. तेव्हा संभाजीराजेंना २००८-०९ सोबत घेऊन आम्ही यात्रा काढली होती. आम्ही त्यांना आपलं समजतो. संभाजीराजेंना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यांना बाहेर पडावं लागेल. पक्ष काढावा लागेल. संभाजी ब्रिगेडमध्ये आम्ही त्यांचे स्वागत करतो. त्यांनी आमच्या पक्षात यावं नेतृत्व करावं, आम्ही त्यांना मुख्यमंत्री बनवू अशी ऑफर संभाजी ब्रिगेडने दिली होती.
छत्रपती घराण्याचा वारस आहे, मॅनेज होणार नाही
कोल्हापूर येथील मूक आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांसंबंधी चर्चा करण्यासाठी निमंत्रण दिले. यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेतला. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठीच मी सरकारशी संवाद साधला. याचा अर्थ मी मॅनेज झालो, असे काढणे चुकीचे आहे. छत्रपती घराण्याचा वारस असल्याने मी मॅनेज होणार नाही, असे प्रतिपादन संभाजीराजे छत्रपती यांनी केले होते.
ओबीसीतून आरक्षण द्या, असे म्हणणार नाही
संभाजीराजे म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी समानतेचा विचार मांडला. त्यांचा वारसदार म्हणून मी ओबीसीचे काढून मराठा समाजाला आरक्षण द्या, ओबीसीतून आरक्षण द्या, अशी भूमिका घेणार नाही. जे जे वंचित आहेत. त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी माझी भूमिका कायम राहणार आहे. ते कसे द्यायचे ते सत्ताधाऱ्यांनी ठरवायचे आहे असंही संभाजीराजे म्हणाले होते.