मुंबई : चाळीच्या जागी जेव्हा इमारती उभ्या राहतील, नवीन घरे मिळतील ती विकू नका. मुंबईतलामराठी टक्का घालवू नका, या ठिकाणचा मराठी आवाज टिकला, दिसला पाहिजे, अशी कळकळीची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. निमित्त होते वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या भूमिपूजनाचे.
मुख्यमंत्री ठाकरे व शरद पवार यांच्या उपस्थितीत रविवारी जांभोरी मैदानात या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी बोलताना शरद पवार यांनी मुंबईत उभ्या राहणाऱ्या ३०-४० मजली इमारतीत कष्टकरी वर्गाला जागा राहिली नसल्याची खंत व्यक्त केली. पवार यांनी व्यक्त केलेल्या भावनेचा धागा पकडत मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, या चाळींनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पाहिली, महाराष्ट्रासाठी रस्त्यावर सांडलेले रक्त पाहिले. यावेळी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पुनर्विकासाच्या कामात करारनामा, विस्थापितांचे प्रश्न अशी अनेक आव्हाने होती. त्यातून मार्ग काढला असून, ३६ महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात येईल. याप्रसंगी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, राज्यमंत्री सतेज पाटील यांचीही भाषणेझाली. या चाळींना ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा आहे. पुनर्वसनानंतर यातील एका चाळीचे संवर्धन करून त्याचे संग्रहालयात रूपांतर करावे. यातून भावी पिढ्यांना या चाळींचा इतिहास जाणून घेता येईल, अशी अपेक्षा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.
एकेकाळच्या गिरण्या गेल्या. तिथे ४०-५० मजली इमारती उभ्या राहिल्या; पण त्यात कामगारांना जागा नव्हती. चाळींच्या जागी आता इमारती उभ्या राहून चांगल्या सुविधा असलेली घरे मिळतील. हा कष्टाचा ठेवा आहे, विकू नका. इथे मराठी आवाज दिसला, टिकला पाहिजे. - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी
मुंबईच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणीत चाळींचा व त्यातील कष्टकऱ्यांचा मोठा वाटा आहे. चाळीतून टॉवरमध्ये गेलात तरी आपली संस्कृती तुटू देऊ नका, हे घर तुमचे स्वतःचे आहे, त्यामुळे कोणत्याही मोहात पडू नका. मराठी पाळंमुळांना धक्का लावू देऊ नका. - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
दीड वर्षाने पुन्हा भूमिपूजन - देवेंद्र फडणवीसआमच्या सरकारच्या काळातच बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या कामाचे भूमिपूजन झाले होते. या प्रकल्पाचा संपूर्ण आराखडा तयार करून, आवश्यक त्या सर्व प्रकारच्या परवानगी घेऊन, त्याच्या निविदा काढून कार्यादेशसुद्धा आमच्या काळात दिले होते, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी स्पष्ट केले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित आज बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. यासंदर्भात फडणवीस यांनी टि्वट करत, आमच्या काळात आराखडा, परवानग्या आणि भूमिपूजनही पार पडले होते. आता तेच काम दीड वर्षांचा विलंब करून पुन्हा सुरू होते आहे. त्याचे भूमिपूजन होते आहे, याचा आम्हाला आनंद आहे. मराठी माणसाला हक्काचे मोठे घर देण्याचा आमचा संकल्प पुन्हा पुढे जाणार याचा आनंद आहे, अशा शब्दात फडणवीस यांनी आजच्या भूमिपूजन कार्यक्रमावर निशाणा साधला.
तर, वरळी नायगाव, ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळींचा भूमिपूजन सोहळा २२ एप्रिल २०१७ रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वरळी जांबोरी मैदानात झाला होता. आज दुसऱ्यांदा भूमिपूजन होत असल्यामुळे राज्य सरकार वेळकाढूपणा तर करत नाही ना. असा प्रश्न करतानाच महाविकास आघाडी सरकारने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करावा. वरळी येथील रहिवाशांना लवकर हक्काची घरे मिळणार असेल तर नक्कीच आम्हाला आनंद होईल, असे दरेकर यांनी सांगितले.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाची वैशिष्ट्येपिढ्यान्पिढ्या १६० चौरस फुटाच्या एका बहुपयोगी खोलीत संसार थाटणाऱ्या हजारो रहिवाशांना या पुनर्वसनातून ५०० चौ. फुटांची अत्याधुनिक सोयीसुविधा असलेली सदनिका विनामूल्य मिळणार आहे. त्याचबरोबर सर्व सोयीसुविधांनीयुक्त एक टाऊनशिप निर्माण होणार असून, नागरी सुविधांचे उत्कृष्ट नियोजन होण्यास मदत होणार आहे.प्रकल्पाची वैशिष्ट्ये -- वरळी येथे सर्वाधिक १२१ चाळी असून, पुनर्विकास प्रकल्पातून ९,६८९ सदनिका उपलब्ध होणार आहेत. यात ९,३९४ निवासी तर २९५ अनिवासी सदनिकांचा समावेश आहे.- पात्र रहिवाशांना ५०० चौ.फुट चटई क्षेत्रफळाची सदनिका मोफत- नमुना सदनिकेचे बांधकाम पूर्ण झाले आहे.- प्रत्येक सदनिकेत व्हिट्रिफाईड टाईल्स, खिडक्यांकरिता पावडर कोटिंगचे अल्युमिनियम फ्रेम- बाथरूम आणि शौचालयात सरळ उंचीच्या टाईल्स- तळमजला अधिक ४० मजल्यांच्या ३३ पुनर्वसन इमारती
- रुग्णालय, वसतिगृह, शाळा, जिमखाना इत्यादी सुविधांकरिता स्वतंत्र इमारतींची उभारणी
- प्रत्येक इमारतीमध्ये ३ पॅसेंजर लिफ्ट, १ स्ट्रेचर लिफ्ट व १ फायर लिफ्टची सुविधा.
- पुनर्वसन क्लस्टरमध्ये मलनिस्सारण प्रकल्प, सौर ऊर्जा, रेनवॉटर हार्वेस्टिंग या पर्यावरणपूरक सुविधा.
- प्रत्येक पुनर्वसन इमारतीत तळ अधिक ६ मजली पोडियम पार्किंग, दोन प्रशस्त जिने असणार आहेत.
- सर्व पुनर्वसन इमारती भूकंपरोधक असणार आहेत.