निरुपम-देवरा वादामुळेच मातोंडकर शिवसेनेत; काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2020 01:37 AM2020-12-03T01:37:52+5:302020-12-03T07:34:07+5:30
मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी प्रभारींची चाचपणी
अतुल कुलकर्णी
मुंबई : संजय निरुपम आणि मिलिंद देवरा यांच्यातील भांडणांना कंटाळून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे मुंबई काँग्रेसमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. महापालिका निवडणूक तोंडावर असताना मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष ठरवण्यासाठी काँग्रेसला मुहूर्त सापडलेला नाही. पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील मुंबई दौऱ्यावर आहेत. ते नव्या अध्यक्षासाठी चाचपणी करत असले तरी नेत्यांची आपापसातली भांडणे त्यांच्यासाठीही डोकेदुखी झाली आहेत.
काँग्रेसने उर्मिला यांना भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात लोकसभेची उमेदवारी दिली होती. मातोंडकर यांनी ही निवडणूक देशभर चर्चेत आणली. मात्र देवरा व निरुपम यांच्यातील भांडणाचा फटका त्यांना बसला. सगळ्या गोष्टी पक्ष नेत्यांना सांगूनही काहीच उपयोग होत नाही हे लक्षात आल्यानंतर, त्यांनी ‘मातोश्री’चा रस्ता धरला. महाविकास आघाडीच्या रुपाने काँग्रेस सत्तेत असतानाही निरुपम शिवसेनेविरोधात विधाने करत असल्याने नाराजी आहे. ही गोष्ट दिल्लीच्या कानावर घातल्यानंतरही निरुपम यांना बिहारमध्ये स्टार प्रचारक म्हणून पाठवले. आपल्याच सरकारच्या सहकारी पक्षाबद्दल विरोधी भूमिका घेऊनही ज्या व्यक्तिवर कारवाई होत नाही तेथे आपले काय, म्हणूनच मातोंडकर यांनी सेनेचा रस्ता धरल्याचे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. पक्षाचे प्रभारी पाटील यांच्या कानावर हा प्रकार घालण्यात आला आहे.
काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे - राजेंद्र दर्डा
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी देखील उर्मिला मातोंडकर यांच्यासारखी आत्मविश्वासू, निडर अभिनेत्री शिवसेनेत जाणे काँग्रेससाठी मोठे नुकसान आहे. शिवसेनेचा फायदा असला तरी काँग्रेसने आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे ट्विट केले आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षाच्या बदलाविषयी चर्चेला जोर आला आहे. मातोंडकरमुळे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी घराघरात सहजपणे जाऊ शकणारा मराठी चेहरा काँग्रेसने गमावल्याची टीका होत आहे.
जगताप, सुरेश शेट्टी अध्यक्षपदाच्या शर्यतीत
मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी भाई जगताप, नसिम खान, अमरजितसिंह मनहास आणि सुरेश शेट्टी या नावांची चर्चा सुरू आहे. भाई जगताप मराठा आहेत. प्रदेशाध्यक्ष पदही मराठा समाजाकडे आहे. त्यामुळे भाई जगताप यांना दुसरी जबाबदारी द्यावी, असा सूर आहे. मुंबईत शिवसेनेसोबत निवडणूक एकत्र लढवायची आहे. त्यामुळे सगळ्या गटांना सोबत घेऊन जाणारा, शरद पवार यांच्यापासून उद्धव ठाकरे पर्यंत सगळ्या नेत्यांची थेट बोलू शकणारा, संवाद कौशल्य असणारा नेता अध्यक्षपदी निवडावा असा सूर आहे.
या निकषात सुरेश शेट्टी यांचे नाव आघाडीवर असले तरी अद्याप दिल्लीने कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब केलेले नाही. मनहास देखील आग्रही आहेत, पण ते दोन वेळा महापालिका निवडणुकीत व एकदा विधानपरिषद पदवीधर मतदारसंघात पराभूत झाले आहेत.
सुरेश शेट्टी यांचे मुंबईत असणाऱ्या ओळखी, आरोग्य मंत्री म्हणून केलेले काम, शिवाय सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध या जमेच्या बाजू आहेत. मात्र ते देखील मावळत्या विधानपरिषद पराभूत झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रभारी कोणाचे नाव घेऊन दिल्लीला जातात, आणि मुंबईला नवा अध्यक्ष कधी मिळतो, हा सध्या काँग्रेस पुढे कळीचा प्रश्न बनला आहे.